ठाणे, दि. ७ जुलै २०२०: कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकांना कोरोनामुळे आपला जीवही गमवावा लागतोय . मात्र कोरोनाला खरंच एवढं घाबरलं पाहिजे का? असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे – पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला आहे.
कोविडची भीती काढायची वेळ आली आहे
अविनाश जाधव यांनी त्यांच्या @avinashjadhavmnsofficial या फेसबुक पेजवर आज एक व्हिडिओ प्रसारित केला, त्यात ते बोलत होते. त्यात त्यांनी कोरोना व्हायरसला एवढं का घाबरायचं असा प्रश्न विचारला. पुढे ते म्हणाले कि, गेल्या काही महिन्यात मी अनेक कोरोना बाधितांना रुग्णालयात दाखल केले, नंतर रुग्णालयातील त्यांचा अनुभव जाणून घेतला. रुग्णालयात लक्षणं नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना दिवसातून ३-४ वेळा औषधे आणि २ वेळा जेवण दिले जाते. हे रुग्ण बरे होऊन बाहेरही येतात पण तेव्हा हॉस्पिटलचे बिल लाख रुपयावर गेलेले असते. पुढे त्यांनी ठाण्यात राहण्याऱ्या एका गृहस्थाचे उदाहरण दिले, ठाण्यातील एका गृहस्थांच्या मुलाला कोरोनाची लागण झाली आणि याचा त्यांनी एवढा धसका घेतला कि, त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यातच त्याचा मृत्यू झाला. मात्र त्यांचा कोरोनाबाधित मुलगा बरा होऊन घरी आला. त्यामुळे कोरोनाची एवढी भीती का बाळगायची असा प्रश्न त्यांनी विचारला. प्रत्येकाच्या मनात असलेली कोविडची भीती काढायची वेळ आली आहे असेही ते म्हणाले.
मीडियाने कोविड – कोविड करून घाबरवलं
कोविडची बाधा झालेले परंतु लक्षणं नसलेले रुग्ण घरच्या घरी किंवा एखाद्या हॉटेलमध्ये राहूनही उपचार घेऊ शकतात असे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे घर लहान असल्यास हॉस्पिटलच्या तुलनेत हॉटलेमध्ये क्वारंटाईन राहिल्यास त्याचा खर्च कमी येतो. पण आपल्याकडे मीडियाने लोकांना एवढं घाबरवलंय कि लोकांना स्वप्नातही कोविड दिसतो. असा टोला त्यांनी प्रसारमाध्यांना लगावला.
व्हिटॅमिनच्या गोळ्यांनी बऱ्या होणाऱ्या आजाराला का घाबरता?
कोविडची लागण झाल्यास रुग्णाला रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीची औषधे दिली जातात आणि तो रुग्ण बराही होतो. मग जो आजार केवळ व्हिटॅमिनच्या गोळ्यांनी बरा होतो त्या आजाराला एवढं का घाबरायचं? लोक कोविडच्या भीतीमुळे हृदयविकाराचा झटका येऊन आणि आत्महत्या करून मरतायत. त्यामुळे सर्वप्रथम कोविडची भीती मनातून काढली पाहिजे असे अविनाश जाधव म्हणाले .
माझा लहान मुलगाही कोविडला घाबरत नाही
सरकारने सांगितलेले नियम पाळले, सोशल डिस्टंसिंग ठेवले, नियमित हात धुवत राहिले तर कोरोनाची लागण होत नाही. माझा लहान मुलगा हे नियमितपणे करतो त्यामुळे तो कोरोनाला घाबरत नाही असेही त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबियांच्या मनातूनही कोरोनाची भीती काढून टाका असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अक्षय बैसाणे