‘त्या’ प्रकरणी आरजेडी नेते सुधाकर सिंह यांना कारणे दाखवा नोटीस

पाटणा, १८ जानेवारी २०३३ :बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याबाबत आरजेडी अध्यक्षांनी पक्षाचे आमदार सुधाकर सिंह यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून त्यांना १५ दिवसांत उत्तर देण्यास सांगितले आहे. आरजेडी अध्यक्ष तेजस्वी यादव यांनी जारी केलेल्या कारणे दाखवा नोटीसमध्ये असे म्हटले आहे की, आमदार सुधाकर सिंह यांनी युती धर्माचे उल्लंघन करणारे आक्षेपार्ह विधान करून पक्षाच्या एका मोठ्या वर्गाला दुखावले आहे.

दरम्यान, आमदार सुधाकर सिंह यांनी यापूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. राजधानी पाटणा येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांना विचारण्यात आले होते की, नितीश कुमार राजकारणात कसे लक्षात राहतील? या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, कर्पूरी ठाकूर, लालू प्रसाद आणि श्रीकृष्ण बाबू यासारखे तर अजिबात आठवणार नाही. ते फार फार तर ‘शिखंडी’ म्हणून स्मरणात राहतील.

नितीश यांच्यावर सातत्याने हल्ले होत आहेत. त्यातच सुधाकर सिंह यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर जेडीयूकडून त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात येत होती. दरम्यान, मंगळवारी पुन्हा एकदा सुधाकर सिंह यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, नितीश कुमार शेतकऱ्यांबाबत खोटे बोलत आहेत. अशा सरकारला धडा शिकवण्याची गरज आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आरजेडीने त्यांच्यावर कारवाई का करू नये , अशी नोटीस बजावली आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा