गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा नंदुरबारमध्ये भीषण आगीत वीस वाहनांसह शोरुम जळून खाक

नंदुरबारमध्ये भीषण आगीत वीस वाहनांसह शोरुम जळून खाक

नंदुरबार, १९ एप्रिल २०२३: शहादा शहरातील वाहन विक्री करणाऱ्या शोरुमला लागलेल्या भीषण आगीत वीस वाहनांसह संपूर्ण शोरुम जळून खाक झाले आहे. ही भीषण आगीची घटना आज पहाटे घडली आहे. या आगीमुळे जवळपास एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

शहादा शहरातील प्रकाशा वळण रस्त्या लगत जकीउदीन हमजा बोहरी रा. प्रकाशवाले यांच्या मालकीचे ट्रॅक्टरचे शोरुम आहे. त्याला लागूनच इलेक्ट्रॉनिक दुचाकी वाहनांचे शोरुम आणि शेती अवजारे विक्रीचे मोठे दुकान आहे. आज पहाटे काही लोक नमाज अदा करुन जात असताना शोरुम मधून आगीच्या ज्वाला पसरत असल्याचे दिसून आले. त्यांनी आरडाओरड केल्याने अन्य नागरिक धावून आले.

पालिका अग्निशमन बंबास पाचारण करण्यात आले. परंतु त्या अगोदरच वाहनांनी पेट घेतला होता. बघता-बघता आगिने रुद्र रूप धारण केले होते. शोरुम मधील सात ट्रॅक्टर, बारा दुचाकी, एक मारुती कार व शेती अवजारे असे एकूण एक कोटी रुपयांचे नुकसान झाले असून, आगीत पूर्णपणे शोरुम जळून खाक झाले आहे. या आगीमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version