श्रद्धा वालकर हत्या : आफताबच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ

नवी दिल्ली, १० जानेवारी २०२३ : श्रद्धा वालकर हत्याकांडातील मुख्य आरोपी आफताब पूनावालाच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. दिल्लीच्या साकेत न्यायालयाने आफताबच्या न्यायालयीन कोठडी १४ दिवसांनी वाढवली आहे. दरम्यान, आफताब पूनावाला याने आता कोठडीत अभ्यासासाठी कायद्याच्या काही पुस्तकांची मागणी केली आहे. त्याचबरोबर न्यायालयाने अधिकाऱ्यांना त्याला उबदार कपडे देण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, या प्रकरणाबाबत चार जानेवारीला डीएनए रिपोर्टमधून एका मोठा खुलासा झाला होता. तपासादरम्यान पोलिसांनी जप्त केलेले केस आणि हाडं ही मृत श्रद्धाचीच असल्याचे डीएनए रिपोर्टमधून स्पष्ट झाले होते. याबाबत दिल्ली पोलिसांनी सांगितले की, नमुन्यांचा माइटोकॉन्ड्रियल डीएन अहवाल पीडितेचे वडील आणि भावाच्या डीएनशी मिळते-जुळते आहे. हे नमुने तपासणीसाठी हैदराबादमधील डीएनए फिंगरप्रिटिंग डायग्नोस्टिक्स सेंटरकडे पाठवण्यात आले होते.

नेमके प्रकरण काय?

एकाच कंपनीत काम करणारे आफताब पूनावाला आणि श्रद्धा वालकर हे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहात होते. आफताबने मे २०२२ मध्ये श्रद्धाची निर्घृनपणे हत्या केली. त्यानंतर सहा महिन्यांनी हे प्रकरण उघडकीस आले. दरम्यान, आफताबने श्रद्धा वालकरचे ३५ तुकडे करुन ते फ्रिजमध्ये साठवले होते. त्यानंतर त्याने ते तुकडे दिल्ली परिसरात महरौली जंगलात फेकले. या घटनेने देशात खळबळ उडाली होती. या घटनेनंतर लव्ह जिहादचा मुद्दा उपस्थित होत आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.