कर्जत, दि. १७ जुलै २०२०: ग्रामदैवत संत श्री गोदड महाराजांची यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द केलेली असताना आज विधिवत पूजा व आवश्यक ते धार्मिक सोपस्कार पार पाडून मूर्तीची मंदिराला प्रदक्षिणा करतात प्रातिनिधिक स्वरूपात यात्रा संपन्न झाली.
कर्जतचे ग्रामदैवत संत श्री गोदड महाराजांची यात्रा दरवर्षी आषाढ वद्य एकादशी संपन्न होत असते मात्र या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने यात्रा रद्द केली असून तीन दिवस जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. सकाळपासूनच श्री गोदड महाराज गल्लीमध्ये सर्व रस्ते पोलिसांनी बंद करून जागोजागी मोठा बंदोबस्त लावला होता, पहाटे श्री गोदड महाराज मंदिराचे पुजारी प्रशांत गंगाधर काकडे यांचा व मानकरी म्हणून ओंकार मेघनाथ पाटील यांचा असे अवघे दोनच अभिषेक करण्यात आले.
मानाच्या ध्वजाची मिरवणूक न काढता तो ध्वज आणण्यात आला. आणि परंपरेनुसार तो मंदिरावर चढविण्यात आला. तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी माना प्रमाणे पूजा केली. सकाळी अकराच्या सुमारास रथ बाहेर काढून उभा करण्यात आला. पाच व्यक्तींनी मंदिरात भजन केले. मूर्तीची पूजा यात्रा कमिटीचे अध्यक्ष मेघराज पाटील यांचे हस्ते करण्यात आली. मानाप्रमाणे श्री विष्णू, हनुमान व गरुड या तीन मुर्त्या मंदिरातून पुजाऱ्यांनी रथापर्यत आणल्या.
मानक-यांसह पाच व्यक्तींद्वारे मूर्तीची पायी नगर प्रदक्षिणा करण्याचे पूर्वीच्या बैठकीत ठरविण्यात आले होते, मात्र लोकांची गर्दी होण्याची शक्यता विचारात घेऊन व कोरोनाचा रुग्ण शहरात निघाल्याने रथ मार्गाचा काही भाग सील केलेला असल्याने अर्धी प्रदक्षिणा करण्याचे ठरविण्यात आले. मात्र ऐनवेळी सर्व बाबी रद्द करून फक्त मानापुरता रथ पाच फूट फक्त हलविण्यात आला, पुजाऱ्यामनी तीनही मुर्त्या हातात घेऊन मंदिर प्रदक्षिणा केली व धार्मिक परंपरा पाळण्यात आली, मानाप्रमाणे मानकऱ्यांचा सत्कार करण्यात आला, दुपारी आ. रोहित पवार यांनी मंदिराचे बाहेरूनच दर्शन घेतले.
यावेळी उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी आ रोहित पवार यांना फेटा बांधला, तर माजी जि. प. सदस्य प्रवीण घुले यांनी मानकऱ्यांचा फेटा बांधून सन्मान केला, यावेळी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष पंढरीनाथ काकडे सह पुजारी उपस्थित होते. उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, आदींसह पोलीस अधिकारी, कर्मचारी व शीघ्र कृती दलाच्या जवानांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.
न्यूज अनकट प्रतिनिधी:जयहिंद पौरष