पुणे, 20 मे 2022: जगभरात महागाई शिगेला पोहोचली आहे. त्याचबरोबर देशाचा आर्थिक विकासही सातत्याने कमकुवत होत आहे. अशा परिस्थितीत आगामी काळात आर्थिक मंदीची चिन्हे दिसू लागल्याचे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. दरम्यान, एकामागून एक अनेक कंपन्या लोकांना कामावरून काढून टाकत आहेत. त्यामुळे हे आर्थिक मंदीचे लक्षण मानावे का? ताजे प्रकरण म्हणजे जुन्या गाड्या विकणाऱ्या एका ई-कॉमर्स कंपनीचे आहे.
Cars24 कंपनीने 600 लोकांना काढलं कामावरून
Cars24 नावाच्या ई-कॉमर्स कंपनीने 600 कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. मात्र, याबाबत कंपनीचं म्हणणं आहे की, व्यवसाय करण्याची ही सामान्य प्रक्रिया आहे. कंपनी दरवर्षी कामगिरीच्या आधारे कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकते, हाही तिचा एक भाग आहे. कंपनीचा खर्च कमी करण्याशी त्याचा काहीही संबंध नाही. Cars24 च्या कर्मचार्यांची संख्या सुमारे 9,000 आहे आणि आता यापैकी 6.6% लोकांनी त्यांच्या नोकऱ्या गमावल्या आहेत.
वेदांतूने महिन्यातून दोनदा लोकांना नोकरीवरून काढलं
दरम्यान, एज्युकेशन टेक कंपनी वेदांतूनेही शेकडो लोकांना दोनदा नोकरीवरून काढून टाकलं आहे. मे महिन्यातच, कंपनीने प्रथम 200 लोकांना कामावरून काढून टाकलं आणि नंतर बुधवारी 424 लोकांना कामावरून काढून टाकलं. कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 5,900 च्या जवळपास आहे. कंपनीने पहिल्यांदाच टाळेबंदीबाबत सांगितले होते की, 120 कंत्राटदार आणि 80 पूर्णवेळ कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करून हा निर्णय घेतला आहे.
बुधवारी, मे महिन्यातच वेदांतूने दुसऱ्यांदा कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं. या संदर्भात कंपनीचे सीईओ वामसी कृष्णा यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या मेलमध्ये अनेक प्रकारची चिंता दिसून येते. कर्मचाऱ्यांच्या कामगिरीशी संबंधित हा विषय नाही. दरम्यान, रशिया-युक्रेन युद्धामुळं जगात अनिश्चितता वाढत आहे. त्याचबरोबर मंदी, चलनवाढ आणि यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ केल्यानेही चिंता वाढलीय.
त्यांनी त्यांच्या ई-मेलमध्ये नमूद केलं आहे की, ‘हे सांगण्याचा कोणताही सोपा मार्ग नाही. पण सांगण्यास खूप वाईट वाटत आहे. पुलकित, आनंद (सहसंस्थापक) आणि मी तुमचा अमूल्य वेळ आणि ऊर्जा वेदांतूला दिल्याबद्दल तुमचे ऋणी राहू. लक्षात ठेवा की ही तुमची चूक नाही किंवा तुम्ही काही केलं आहे किंवा केलं नाही म्हणून हे घडत नाही. तुम्ही खूप छान आहात आणि इतर कंपन्या तुमच्यासाठी तयार असतील.
Unacademyनेही 600 लोकांना नोकरीवरून काढलं
याआधी एप्रिलमध्ये आणखी एका एज्युटेक कंपनी Unacademyने 600 जणांना कामावरून काढून टाकलं होतं. लिडो लर्निंग या स्टार्टअप कंपनीने रॉनी स्क्रूवाला यांच्याकडून गुंतवणूक प्राप्त केली असताना त्यांचे कामकाज बंद केलं आहे आणि अनेक कर्मचाऱ्यांचं म्हणणे आहे की लिडोने गेल्या अनेक महिन्यांपासून पगार दिलेला नाही. याशिवाय Meesho, Furlenco आणि Trell या कंपन्यांनीही लोकांना कामावरून काढून टाकलं आहे.
Netflix ने 150 लोकांना कामावरून काढून टाकले
नोकरीवरून काढण्याच्या घटना केवळ भारतातच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यातही पाहायला मिळत आहेत. लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म Netflix ने देखील सुमारे 150 कर्मचारी आणि दहा ते पंधरा कंत्राटदारांना कामावरून काढून टाकलं आहे. नेटफ्लिक्सच्या फॅन-फोकस वेबसाइट Tudumसाठी काम करणार्या किमान 26 कंत्राटदारांना कामावरून काढून टाकण्यात आल्याचं द व्हर्जने सूत्रांच्या हवाल्याने म्हटलं आहे. Netflix ने यापूर्वी मार्केटिंग टीममधून सुमारे 25 लोकांना वगळलं आहे, त्यापैकी सुमारे 10-15 लोक Tudumशी संबंधित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे