सिंधुदुर्ग हादरलं:दोन महिन्यांपासून बेपत्ता मुलीचा मृतदेह सापडला, एकतर्फी प्रेमातील खून

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही मुलगी दोन महिन्यांपासून बेपत्ता होती आणि तिचा शोध सुरु होता. अखेरीस तिचा मृतदेह जंगलात सापडला, ज्यामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. घटना एका एकतर्फी प्रेम प्रकरणातून घडल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

कुडाळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीच्या मोबाईलवर शेवटचा कॉल ज्या व्यक्तीकडून आला होता, त्या व्यक्तीवर संशय होता. संशयित कुणाल कुंभार माने याला पोलिसांनी तीन ते चार वेळा चौकशीसाठी बोलावले होते, मात्र दरवेळी तो वेगवेगळी माहिती देत होता. कडक चौकशीनंतर त्याने संपूर्ण घटनाक्रम पोलिसांना सांगितला आणि खून कबूल केला. आरोपी हा गोठोस कुडाळ येथील रहिवासी आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, 2 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 6:15 वाजता कॉलेजला जाण्याची कहाणी सांगून ही मुलगी घरातून बाहेर गेली, परंतु ती परत आली नाही. तिच्या नातेवाईकांनी अनेक ठिकाणी शोध घेतला, तरीही ती सापडली नाही. अखेरीस तिच्या आईने कुडाळ पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आणि अपहरणाचा गुन्हा दाखल केला गेला.

कुणाल कुंभारने अल्पवयीन मुलीला माणगाव-शिवापूर मार्गावरील आंबरी येथून मोटरसायकलवर बसवून वाडोस-बाटमाचा चाळा येथील कच्च्या रस्त्यावर नेऊन तिचा गळा दाबून ठार केले. नंतर मृतदेह डॉ. शरद पाटील यांच्या शेतमांगरात लपवून ठेवला. पोलिसांनी आरोपीकडून मृतदेह लपवलेल्या जागेची माहिती मिळवली आणि तिथे जाऊन मृतदेह शोधला.

मृत मुलीच्या आई आणि बहिणींनी घटनास्थळी मृतदेह ओळखला. संशयित आरोपी कुणाल कुंभार माने याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याला कुडाळ प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला सोमवार, 6 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या या घटनेचा सखोल तपास सुरु आहे.

ही घटना संपूर्ण तालुक्यात एकदात खळबळ उडवणारी ठरली असून, एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या हत्येच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन आणि पोलिस तपासात व्यस्त आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी ध्रुव पाटील