सिंहगड इन्स्टिट्यूटला महापालिकेचा दणका, 345 कोटींच्या थकबाकीमुळे कार्यालय सील!

Image of Singhgad Institutes building with a red 'Taxes Due' stamp overlay, indicating unpaid property taxes-Property Taxes Due - Official notice regarding pending tax payments
सिंहगड इन्स्टिट्यूटला महापालिकेचा दणका, 345 कोटींच्या थकबाकीमुळे कार्यालय सील!

Sinhagad Institute gets a blow from the Municipal Corporation: पुणे महापालिकेने थकबाकी वसुलीसाठी कडक पाऊल उचलले आहे. सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या वडगाव बुद्रुक येथील 43 मिळकती आणि कोंढवा येथील 6 मिळकतींच्या थकबाकीमुळे महापालिकेच्या मिळकत कर विभागाने संस्थेचे वडगाव येथील कार्यालय सील केले आहे. संस्थेच्या शहरात एकूण 128 मिळकती असून, त्यांची 345.43 कोटी रुपये मिळकत कर थकल्याची माहिती मिळकत कर विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी दिली.

सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट या शिक्षण संस्थेच्या शहरात विविध ठिकाणी मिळकती आहेत. या मिळकतींच्या करासंदर्भात महापालिका व संस्था यांच्या न्यायालयात वाद सुरू आहेत. संस्थेच्या 128 मिळकतींचा तब्बल 345.43 कोटी मिळकत कर थकलेला आहे. त्यामुळे महापालिकेच्या मिळकत कर विभागाने ज्या मिळकतीसंदर्भात न्यायालयाचे आदेश नाहीत, अशा मिळकतींवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. यापूर्वी एरंडवणा येथील संस्थेचे मुख्य कार्यालय 47.43 कोटींच्या थकबाकीपोटी महापालिकेने सील केले आहे. लवकरच या मिळकतीच्या लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.

आता मिळकत कर विभागाने सिंहगड संस्थेच्या वडगाव बुद्रुक येथील 43 मिळकतींच्या 198.61 कोटींच्या थकबाकीपोटी मंगळवारी येथील संस्थेचे कार्यालय सील करण्यात आले. याशिवाय संस्थेकडे कोंढवा येथील 6 मिळकतींची 20.50 कोटी रुपये मिळकत कराची थकबाकी असल्याचे जगताप यांनी सांगितले. यापूर्वी न्यायालयाने दिलेल्या आदेश देऊनही संस्थेने कराची रक्कम भरली नाही. त्यामुळे पालिकेने अवमान याचिकाही दाखल केली आहे.

शहरातील एकूण 438 शासकीय मिळकतींची 93.24 कोटी थकबाकी आहे. ती वसूल करण्याबाबत शासकीय मिळकतधारकांकडे पाठपुरावा सुरू आहे. शहरातील टॉप 100 थकबाकीदार मिळकतधारकांची 334.10 कोटी इतकी थकबाकी आहे. सर्वाधिक करथकबाकी फुरसुंगीचे संतोष काटेवाल यांची 18 कोटी 44 लाख 37 हजार 585 रुपये इतकी थकबाकी आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे