गोल पोस्ट महाराष्ट्र “सर-नाईक यांचा प्रताप” मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून भाजपशी मिळवणी करण्याची मागणी

“सर-नाईक यांचा प्रताप” मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून भाजपशी मिळवणी करण्याची मागणी

ठाणे, २१ जून २०२१: शिवसेना आमदार प्रताप सरनाईक अनेक काळानंतर समोर आल्यानंतर त्यांनी मोठा स्फोट केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून, पत्राद्वारे खास मागणी केली आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा भाजपशी हात मिळवणी करा, असा सल्ला सरनाईकांनी मुख्यमंत्र्यांना दिला. प्रताप सरनाईक यांनी लेटरबाँब फोडून स्वत:च्या अस्त्तित्वाची जाणीव करुन दिली. ठाण्यात प्रताप सरनाईक कुठे? अशा प्रकारचे फलक लागले असताना, त्यांनी समोर येऊन सगळ्यांना मोठा धक्का दिलाय.

केंद्राच्या आणि राज्याच्या संघर्षामध्ये ज्या लोकप्रतिनिधींचा बळी जातो आहे, त्यात एक प्रताप सरनाईक आहे. सध्या ईडीच्या प्रकरणामुळे सोशल मिडीयासमोर न जाता माझ्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा माझा प्रयत्न असल्याचं त्यांनी माध्यमांना सांगितलं. त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहीलेल्या पत्रात सांगितले की मुख्यमंत्री आपल्या पदाला योग्य न्याय देत आहेत. मात्र दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला शिवसेनेचा मुख्यमंत्री त्यांच्यामुळे झाला, असं वाटतं आहे. तर दुसरीकडे काँग्रेस मात्र “एकला चलो रे”अशी भूमिका घेत आहे. तसेच ते शिवसेनेचे नेते फोडत असल्याचं चित्र दिसत आहे. आपला पक्ष कमकुवत करत आहे, असं जर आपणांस वाटत असेल तर पुन्हा एकदा आदरणीय पंतप्रधान मोदीजी यांच्याशी जुळवून घेतलेलं बरं, असं माझं वैयक्तिक मत असल्याचं प्रताप सरनाईक यांनी पत्रात नमूद केलं.

ब-याच काळानंतर माध्यमांसमोर आल्यानंतर ते ठाण्यामध्ये बोलत होते. एकुणातच मुख्यमंत्र्यांनी पक्षात लक्ष घालावं, असा आडशेरा त्यांनी दिला, हे मात्र खऱं.

न्यूज अनकट प्रतिनिधी; तृप्ती पारसनीस

error: Content is protected !!
Exit mobile version