मुंबई, २० सप्टेंबर २०२०: सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारविरोधात मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. सरकारनं आरक्षणाचा तिढा लवकरात लवकर सोडवला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर सोलापूर, औरंगाबाद, पुणे या ठिकाणी याआधी आंदोलनं करण्यात आली होती आणि आता आज मुंबईमध्ये देखील ठीक ठिकाणी अशी आंदोलनं करण्यात येणार आहेत.
मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मुंबईत आज (२० सप्टेंबर) १८ ठिकाणी आंदोलनं केली जाणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करत आंदोलन करणार असल्याचं मराठा क्रांती मोर्चाकडून सांगण्यात आलं आहे. सकाळी ११ ते दुपारी १ पर्यंत ठिय्या आंदोलन करण्यात येणार होतं.
या आंदोलनादरम्यान सर्व नियमांचं देखील पालन करण्यात येणार आहे. यावेळी आंदोलनकर्ते हे तोंडाला मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझर या सर्व दक्षतेचे पालन केले जाईल, असं सांगण्यात आेलं आहे. मराठा आरक्षणाच्या स्थगितीविरोधात मराठा क्रांती मोर्चा निषेध नोंदवणार आहेत. मुंबई लगतच्या शहरांमध्ये एकाच वेळी ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे