गोल पोस्ट महाराष्ट्र झाडाखाली बसून विधानसभा उपाध्यक्षांनी घेतला जनता दरबार

झाडाखाली बसून विधानसभा उपाध्यक्षांनी घेतला जनता दरबार

दिंडोरी, दि. १९ जुलै २०२०: विधानसभा उपाध्यक्ष आमदार नरहरी झिरवाळ यांनी वणी येथील शासकीय विश्रामगृहात शासकीय अधिकार्‍यांसमवेत आढावा बैठक घेतली. यावेळी अनेक कार्यकर्ते, ग्रामस्थही उपस्थित होते. मात्र, त्यांना झिरवाळ यांनी बाजूला बसायला सांगत बैठक होताच आपण बोलू असे सांगितले. विविध कामे घेऊन आलेले ग्रामस्थ बाजूला झाडाखाली बसलेले होते. बैठक आटोपण्याची वाट बघत होते. तासाभरानंतर बैठक आटोपली अन् झिरवाळ हे थेट ग्रामस्थानमध्ये जाऊन बसले.

आलेल्या वेगवेगळ्या लोकांशी तिथेच चर्चा करत संबंधित अधिकार्‍यांशी मोबाईलवर बोलून कामे मार्गी लावत होते. तब्बल तीन तास हा जनता दरबार झाडाखाली सुरू होता. एकीकडे प्रश्न सोडवत असताना येवला येथील एक कार्यकर्त्यांचा मुलगा दहावीत ९८ टक्के गुण मिळवत उत्तीर्ण झाल्याचे त्यांना समजले. त्याचे कौतुक करत झिरवाळांनी या मुलाच्या वडिलांचा सत्कार केला.

विधानसभा उपाध्यक्ष झाले तरीही झिरवाळ यांनी जनतेत मिसळणे कायम ठेवले आहे. ज्या जनतेने आपल्याला संधी दिली त्यांच्यासाठी कोणताही प्रोटोकॉल आड येणार नाही. जनतेत राहून जनतेचे प्रश्न सोडवणे यासाठी आपण कार्यरत राहू असे झिरवाळ यांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version