पुणे, दि.९ जून २०२०: पिंपरी चिंचवड येथे एकाच कुटुंबातील सहा जणांनी मिळून एका तरुणाची निर्घृण हत्या केली आहे. मुलीवर करत असलेल्या प्रेमातून ही हत्या केल्यामुळे हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरात एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवडमधील सांगवी परिसरातील पिंपळे सौदागर मध्येही ही घटना घडली आहे. विराज जगताप हा आरोपी जगदीश काटे यांच्या मुलीवर प्रेम करत होता. विराज आपल्या मुलीवर प्रेम करतो ही गोष्ट लक्षात आल्यानंतर आरोपी हेमंत काटे, सागर काटे आणि अन्य ४ आरोपींनी विराजवर हल्ला केला. ७ जून रोजी रात्री १०च्या सुमारास विराज जगताप हा आपल्या दुचाकीवरून जात होता. त्यावेळी आरोपींनी टेम्पोतून पाठलाग करून पिंपळे सौदागर येथील शिव बेकरीजवळ त्याच्या दुचाकीला धडक देऊन खाली पाडले. टेप्पोच्या धडकेमुळे विराज खाली पडला. त्यानंतर आरोपी हेमंत काटे, सागर काटे, जगदीश काटे, रोहित काटे, कैलास काटे आणि हर्षद काटे या आरोपींनी लोखंडी रॉड आणि दगड घेऊन विराजला बेदम मारहाण केली.
‘तुझी लायकी आहे का माझ्या मुलीवर प्रेम करायची, तरी तू माझ्या मुलीवर प्रेम करतो’, असं म्हणून आरोपी त्याच्या अंगावर थुंकले आणि लोखंडी रॉड विराजच्या डोक्यात घातला आहे. सहा आरोपींनी दगड आणि लोखंडी रॉडने विराजला बेदम मारहाण केली. बेदम मारहाणीमुळे विराज जागेवर बेशुद्ध पडला. विराज बेशुद्ध पडल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर विराजला नागरिकांनी जखमी बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. परंतु, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. या प्रकरणामुळे पिंपरी चिंचवड शहरात एकच खळबळ उडाली आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: