नवी दिल्ली, १२ जानेवारी २०२३ : हरियाणातील पानिपतमध्ये सिलिंडरच्या स्फोटात पती-पत्नी आणि चार मुलांसह सहाजण होरपळले आहेत. पानिपतच्या बिचपडी गावात सकाळी सात वाजता ही भीषण दुर्घटना घडली.
याविषयी अधिक माहिती अशी, की हरियाणाच्या पानिपतमधील बिचपडी गावात सकाळी सात वाजता सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामुळे घराला आग लागली. आग इतकी भीषण होती, की घरातील सदस्यांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. या अपघातात संपूर्ण कुटुंब जळून खाक झाले असून, चार मुलांसह सहाजणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
अब्दुल करीम (वय ५०), त्यांची पत्नी अफरोजा (४६), मोठी मुलगी इशरत खातून (१७), रेश्मा (१६), अब्दुल शकूर (१०) आणि अफान (७) अशी मृतांची नावे आहेत. दरम्यान, अपघातात बळी पडलेले कुटुंब मूळचे पश्चिम बंगालचे आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सध्या मदत आणि बचावकार्य सुरू आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील