युपी, श्रावस्ती : दि. २८ एप्रिल २०२० :
लॉकडाऊनमध्ये एक युवक मुंबई वरून सोळाशे किलोमीटर अंतर चालत युपी मधील श्रावस्ती जिल्ह्यामध्ये पोहोचला आणि तिथून तो आपल्या गावीसुद्धा गेला. तिथे पोहोचल्यावर प्रशासनाने त्याला गावातील एका शाळेमध्ये १४ दिवसांसाठी क्वारंटाईन करून ठेवले. परंतु क्वारंटाईन केल्यानंतर केवळ सहा तासांमध्ये त्याचा रहस्यमयरित्या मृत्यू झाला.
सोमवारी पहाटे सात वाजता हा तरुण महाराष्ट्रातील मुंबईपासून १६०० किमी अंतरावरील आपल्या गावी पोहोचला. दिवसा एक वाजण्याच्या सुमारास बोलत असताना त्याचा मृत्यू झाला. क्वारंटाईन सेंटरमधील युवकाच्या मृत्यूची बातमी आग लागल्याप्रमाणे पसरली आणि त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली. आरोग्य विभाग आणि पोलीस विभागाचे उच्च अधिकारी घाईघाईने खेड्यात दाखल झाले जिथे त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला आणि कोरोना प्रोटोकॉल अंतर्गत पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला. क्वारंटाईन मध्ये एका युवकाचा रहस्यमयरित्या मृत्यू होतो याचा तपास लावणे म्हणजे आरोग्य आणि पोलिस कर्मचाऱ्यांसमोर कोडे निर्माण झाले आहे.
युवकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या मृतदेहाजवळ आलेल्या त्याच्या घरच्यांना देखील त्या शाळेमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. मृतकाच्या घरचे म्हणत आहेत की, त्याच्या शरीराची अवस्था बघूनच समजत आहे की मुंबईवरून तो इथपर्यंत पूर्ण अंतर चालत आलेला आहे.
या संपूर्ण प्रकरणाबद्दल श्रावस्तीचे सीएमओ पी. भार्गव म्हणाले की, त्याचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही व्यक्ती सोमवारी सकाळी सात वाजता महाराष्ट्रातून आली. आतापर्यंत विशेष काहीही स्पष्ट नाही, काहीही सांगणे कठीण आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी