२०२५ पर्यंत देशाला धूम्रपानमुक्त करण्यासाठी उचलले पाऊल : सह आरोग्यमंत्री डॉ. आयेशा वेरल
पुणे, १६ डिसेंबर २०२२ : धूम्रपान आरोग्यासाठी किती हानिकारक आहे, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. याच गोष्टीवर लक्ष केंद्रित करून आता न्यूझीलंडने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता तरुणांच्या धूम्रपानावर बंदी येणार आहे. याबाबत सरकारने मंगळवारी संसदेत एक कायदा मंजूर केला आहे. या कायद्यानुसार न्यूझीलंडच्या (२००९ नंतर जन्मलेल्या) येणाऱ्या पिढ्यांना तंबाखू खरेदीवर बंदी घालण्यात येणार आहे. २०२५ पर्यंत देशाला धूम्रपानमुक्त करण्यासाठी हे पाऊल उचलले असल्याचे देशाच्या सह आरोग्यमंत्री डॉ. आयेशा वेरल यांनी सांगितले.
सरकारच्या मते, पुढील पिढीसाठी धूम्रपान प्रतिबंधित करणारा हा जगातील पहिला कायदा असेल. नवीन कायद्यामध्ये १ जानेवारी २००९ किंवा त्यानंतर जन्मलेल्या कोणालाही तंबाखू विकण्यावर बंदी घालण्यात आली आहे. कोणीही उल्लंघन करताना आढळल्यास दीड लाख डॉलर्सपर्यंत दंड होऊ शकतो. याव्यतिरिक्त, धूम्रपानबंदी व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्यासाठी लागू राहील, असेही कायद्यात नमूद करण्यात आले आहे.
पुढील काही वर्षात देशाला तंबाखूमुक्त करण्याचे नियोजन सरकार करत आहे. न्यूझीलंडमध्ये दरवर्षी पन्नास लाख लोकसंख्येपैकी पाच लाख लोक धूम्रपान करतात. दरवर्षी साडेचार हजार जणांचा मृत्यू होतो. न्यूझीलंडच्या सह आरोग्यमंत्री डॉ. आयेशा वेरल यांनी सांगितले, की धूम्रपानमुक्त पिढी तयार करण्यासाठी वर्ष २०२२ मध्ये १८ वर्षांहून कमी वयाच्या तरुणांना तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस मनाई करण्यात आली आहे. सध्या असलेली परिस्थिती आणि नियमांचे पालन केल्यास नक्कीच लक्ष्य गाठता येणार आहे. त्यामुळे तंबाखूजन्य पदार्थ खरेदी करताना तुमचे वय साधारण ६३ वर्षे असल्याचे ओळखपत्र दाखवावे लागणार आहे. फक्त वयस्कारांसाठी सिगारेट खरेदी विक्री लागू आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सतीश पाटील