बुलढाणा, १ फेब्रुवारी २०२४ : बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद या तालुक्याच्या जवळच मध्य प्रदेशाची सीमा आहे. त्यामुळे या मार्गे आतापर्यंत बऱ्याच वेळेला गुटख्याची तस्करी होताना दिसून आली आहे. पण या गुटखा तस्करीवर एलसीबी किंवा अन्न औषध प्रशासन विभागाकडून कारवाई झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे स्थानिक पोलिसांना या तस्करीची माहिती मिळत नाही की काही आर्थिक संबंध जोपासत जळगाव पोलीस दुर्लक्ष करतात याबद्दल तेथील नागरिकांना प्रश्न पडला आहे.
काल मध्य प्रदेशातून बऱ्हाणपूर रोडने जळगाव जामोद शहरातून एक ट्रक भरधाव वेगाने जात होता. जाताना या ट्रकने स्थानिक एमसीएन न्यूजचे संपादक राजीव वाढे यांना कट मारला आणि पुढे जाऊन एका महिलेला कट मारत आसलगावकडे भरधाव वेगात निघून गेला. तेव्हा राजीव वाढे यांना ट्रकमध्ये काही अवैध साहित्य असल्याचा संशय आल्याने त्यांनी त्यांचे आसलगाव येथील प्रतिनिधी संजय दांडगे यांना कॉल करून सदर ट्रक अडवायला सांगितला. संजय दांडगे यांनी गावातील काही लोकांच्या मदतीने त्या ट्रकला आसलगाव येथे अडवले आणि ट्रक ड्रायव्हरकडे ट्रकमधील साहित्याबाबत चौकशी केली. पण सदर ड्रायव्हरने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने गावातील काही लोकांनी ट्रकमध्ये चढून साहित्याची पाहणी केली असता त्यात त्यांना गुटखा आढळून आला.
या प्रकरणाची माहिती गावकऱ्यांनी जळगाव पोलीस स्टेशनला दिली. पण पोलीस उशिरा आल्याचे गावकऱ्यांकडून सांगितले जाते. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर जळगाव पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बऱ्हाणपूर रोडवरून लाखोंचा प्रतिबंधित गुटक्याची सर्रास तस्करी होत आहे आणि पोलीस प्रशासन कारवाई करत नाही त्यामुळे त्यांच्यात काही आर्थिक संबंध असू शकतात अशी शंका लोकांकडून व्यक्त केली जात आहे. सदर ट्रकमध्ये १२० गोण्यांमध्ये गुटखा ठासून भरलेला होता. पण या गुटख्याची नेमकी किंमत किती? आणि या गुटख्याची तस्करी कोण करत आहे? याचे तपास अजून बाकी आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : संतोष कुलथे