इंदापूर- आगामी विधानसभा निवडणुकीसाठी देशातील मोठे नेते राज्यात आपल्या प्रचारसभा घेत आहेत. यातच महायुतीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारासाठी इंदापूर मतदारसंघातील निमगावमध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची सभा आयोजित केली होती. यावेळी स्मृती इराणीं यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर जोरदार घणाघात केला. “वेळेनुसार चालने आणि गरिबांचा विचार करणे हे कधीही काँग्रेस राष्ट्रवादीला जमले नाही. ज्यांचे स्वतःचे घड्याळचं बंद आहे, त्यांना वेळेचे महत्व काय कळणार,” असा टोला स्मृती इराणी यांनी लगावला.
पुढे स्मृती म्हणाल्या की, “काश्मीरच्या नावाखाली देशाला लुटण्याचे काम तीन कुटुंबांनी केले. ३७० कलम हटवण्याबाबत संसदेच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने तो आंतरराष्ट्रीय प्रश्न असल्याने आपण कशाला निर्णय घ्यायचा असे म्हणत याला विरोध केला. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाकडे संपुर्ण देशाचे लक्ष लागले आहे. मात्र असे असले तरी काँग्रेसच्या नेत्याच्या तोंडूनच आता बाहेर पडू लागले की, सत्तर वर्षात काहीच झाले नाही. त्यामुळे २१ तारखले जनता कमळाचे बटन दाबेल,” असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
“निवडणूक जवळ आल्यावर जातीचे राजकारण केले जाते. ते रक्त जमिनीवर सांडलेले रक्त कोणाचे याचे उत्तर देऊ शकतात. आधी मुलींच्या लग्न व घरच्या अडचणींसाठी शेती सावकाराकडे गहाण ठेवली जात. आता या सरकारला सावकाराकडून घेतलेले कर्ज ही माफ करून टाकले. देशाच्या इतिहासात भाजप सरकारने सर्वात मोठी कर्जमाफी दिली.असा उल्लेख इराणी यांनी केला.”