नवी दिल्ली, ११ डिसेंबर २०२२ एयर इंडिया एक्सप्रेसच्या विमानात साप आढळल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे प्रवाशांची चांगलीच घाबरगुंडी उडाली. एअर इंडिया एक्स्प्रेसचे केरळहून निघालेले विमान शनिवारी दुबई विमानतळावर उतरले, तेव्हा त्याच्या कार्गो होल्डमध्ये साप आढळून आला. सुदैवाने या घटनेत सर्व प्रवासी सुखरूप आहेत. घटनास्थळी विमानतळ अग्निशमन दल पोहोचले आणि त्यांनी सापाला विमानातून बाहेर काढले होते. दरम्यान या घटनेनंतर डीजीसीएने (DGCA) या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडिया एक्सप्रेसच्या फ्लाइट क्रमांक B737-800 मध्ये साप आढळला. हे विमान केरळमधील कालिकत येथून दुबई विमानतळावर पोहोचले. दरम्यान विमानाच्या कार्गो होल्डमध्ये साप आढळल्याने प्रवासी घाबरले. सुदैवाने सापामुळे कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही. प्रवाशांना विमानातून सुखरूप बाहेर काढण्यात आले.
DGCA च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दुबई विमानतळावर पोहोचल्यानंतर एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाच्या कार्गो होल्डमध्ये साप आढळून आला. प्रवाशांच्या हे लक्षात येताच प्रवासी घाबरले. विमानात साप आढळल्याची माहिती विमानतळ अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली. यावेळी सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यानंतर हे विमान ग्राउंड स्टाफच्या ताब्यात देण्यात आले.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.