मुंबई, २४ सप्टेंबर २०२०: बॉलीवूड अभिनेत्री कंगना रानौत आणि शिवसेना वाद काही केल्या थांबत नाहीय. गेल्या अनेक दिवसांपासून कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, मुंबई महानगरपालिका आणि संपूर्ण ठाकरे सरकारवर सात्यत्याने टीका केली आहे. काही दिवसांपूर्वी भिवंडीत इमारत कोसळली होती त्यात अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले. याच मुद्द्यावरून कंगनानं पुन्हा एकदा ट्विट करून मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडलं आहे.
नेमकं काय म्हणाली कंगना?
”उद्धव ठाकरे, संजय राऊत…जेव्हा माझं घर बेकायदेशीरपणे तोडलं जात होतं, तेव्हा तितकं लक्ष या इमारतीवर दिलं असतं तर आज जवळपास ५० लोक जिवंत असते. पाकिस्तानने केलेल्या पुलवामा हल्ल्यात इतके जवान मारले गेले नाही, जितके निष्पाप तुमच्या निष्काळजीपणामुळे गेलेत. मुंबईचं काय होणार देवालाच माहित” असे ट्वीट कंगनाने केले. या ट्विटमध्ये कंगनाने मुंबई महापालिकेलाही टॅग केलं आहे.
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलीवूडमधील नेपोटीझम आणि नंतर ड्रग्स कनेक्शन अशा अनेक मुद्द्यांमुळे कंगना गेल्या अनेक दिवसांपासून सतत चर्चेत आहे. मुंबई महानगरपालिकेने कंगनाचे मुंबईतील अनधिकृत कार्यालय तोडल्यानंतर कंगनानं मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत जहरी टीका केली होती. मुंबईला पाकिस्तान म्हणणाऱ्या कंगनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ”वाय प्लस” दर्जाची सुरक्षा देऊ केली आहे. सोबतच भाजपकडून कंगनाला चांगलाच पाठिंबा मिळत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अक्षय बैसाणे