Softshell Turtle Hatchlings Released in Mawal: मावळ तालुक्यात परंदवाडी येथे एका रोपवाटिकेत आढळलेल्या कासवाच्या २२ अंड्यांचे यशस्वी कृत्रिम उबवणूक करण्यात आले. यातून २० गोंडस पिले बाहेर आली असून, त्यांना नुकतेच त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या तत्परतेमुळे हे शक्य झाले आहे.
जैवविविधतेच्या संवर्धनात मावळ तालुक्याची महत्त्वाची भूमिका;
७ मार्च रोजी परंदवाडीतील नर्सरीमध्ये दीपक महाजन यांना कासवाची अंडी आढळून आली होती. त्यांनी त्वरित वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य निनाद काकडे यांना याची माहिती दिली. त्यानंतर काकडे आणि अनुभव रणपिसे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अंड्यांना सुरक्षितपणे ताब्यात घेतले आणि कृत्रिम उबवणुकीसाठी व्यवस्था केली.


या अंड्यांमध्ये ‘लेईथ्स सॉफ्टशेल टर्टल’ अर्थात ‘निल्सोनिआ लेथी’ या दुर्मिळ प्रजातीची पिले होती. अथक प्रयत्नांनंतर, ७ एप्रिल रोजी या अंड्यांमधून २० निरोगी पिले बाहेर आली, तर दोन अंड्यांमध्ये पिले विकसित होऊ शकली नाहीत.
वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक नीलेश गराडे, जिगर सोलंकी, निनाद काकडे आणि वडगावचे वनरक्षक योगेश कोकाटे यांनी या पिलांची प्राथमिक तपासणी केली. सर्व पिले सुदृढ असल्याची खात्री झाल्यावर, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश शिंदे, वनपाल एम. हिरेमठ आणि वनरक्षक योगेश कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना निसर्गाच्या सान्निध्यात मुक्त करण्यात आले.
या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल बोलताना वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक नीलेश गराडे आणि अध्यक्ष अनिल आंद्रे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही वन्यप्राणी जखमी अवस्थेत आढळल्यास त्वरित प्राणीमित्र किंवा वन विभागाशी संपर्क साधावा. त्यांनी सांगितले की, कासवांचे संवर्धन करणे हे परिसंस्थेतील जैवविविधता टिकवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे आणि मावळ तालुक्यात ही कासवे आढळणे ही आनंदाची बाब आहे. कासव पर्यावरणाचे संतुलन राखण्यात मोलाची भूमिका बजावतात.
वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश शिंदे यांनी सांगितले की, सॉफ्टशेल टर्टल प्रजातीमधील हा एकच कासव भारतात आढळतो आणि कासवे पाळणे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे त्यांच्या संरक्षणासाठी प्रयत्न करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यांनी नागरिकांना आवाहन केले की, कोणताही जखमी वन्य प्राणी आढळल्यास त्वरित वन विभागाला कळवावे.
या यशस्वी उबवणुकीमुळे आणि पिलांना निसर्गात सोडल्यामुळे वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे कार्य कौतुकास्पद आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे या दुर्मिळ प्रजातीच्या संवर्धनाला मदत झाली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे