सोलापूर, १६ डिसेंबर २०२२ : छत्रपती शिवाजी महाराज तसेच थोर पुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या विरोधात उद्या मुंबईत महाविकास आघाडीचा महामोर्चाची तयारी सुरु असताना, आणि अद्याप या महामोर्चाला पोलिसांनी परवानगी दिलेली नसताना, दुसरीकडे मात्र राज्यातील विविध भागात छत्रपती शिवाजी महाराज तसेच थोर पुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणार्यांविरोधात बंद पुकारुन निषेध केला जात आहे, दरम्यान, पुण्यानंतर आता आज सोलापूरमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदमध्ये भाजप, मनसे आणि शिंदे गट वगळून सर्वच राजकीय संघटना आणि छोट्यामोठ्या संघटना सहभागी होणार आहेत.
- दुपारी दोन वाजेपर्यंत असणार बंद
श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाने दुपारी दोन वाजेपर्यंत सोलापूर बंद पुकारला आहे. हा बंद शांततेत होईल. या बंदमध्ये अनेक शाळा, महाविद्यालये, व्यापारी संघटनांचे पदाधिकारी स्वयंस्फूर्तीने सहभागी होणार असल्याचा दावा मंडळाचे उत्सव अध्यक्ष शेखर फंड यांनी केला आहे. दरम्यान आज सकाळपासून सुरु होणारे सोलापुरातील व्यवहार ठप्प असल्याचे पाहायला मिळत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व व्यवहार बंद आहेत.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ रॅलीची सांगता
शिवजन्मोत्सव मंडळाचे प्रमुख पदाधिकारी सकाळी नऊ वाजता सम्राट चौकात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमा होतील. सर्व कार्यकर्ते सुपर मार्केट येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अपर्ण करतील. त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, चार हुतात्मा आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ अभिवादन रॅलीची समाप्ती होईल. शहरवासीयांनी दुपारी दोन वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळून इतर व्यवहार बंद ठेवावेत, असे आवाहन शिवजन्मोत्सव मंडळाने केले आहे.
सोलापूरचे पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी सांगितले की, या बंदच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर पोलीस सतर्क असून शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नऊ वरिष्ठ पोलीस निरीक्षक, २७ सहाय्यक पोलीस निरीक्षक, १५४ पोलीस अंमलदार, चार राखीव पोलीस दलाच्या तुकड्या, ९ जलद प्रतिसाद टीम शहरातील बंदोबस्तामध्ये सहभागी आहेत.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.