सोलापूर, दि.९ जून २०२०: यंदाच्या पावसाळ्यात मृग नक्षत्राला रविवारपासून प्रारंभ झाला आहे. यंदाच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला होता. मात्र रविवारपासून सुरू झालेले मृग नक्ष कोरडे जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या आठवड्यात सोलापूर जिल्ह्यात रोहिणी नक्षत्रातील पावसाने जिल्हाभर कमी अधिक प्रमाणात दमदार हजेरी लावली. या पावसामुळे यंदा चांगला पाऊस पडणार अशीच काहीशी आशा निर्माण झाली होती. रोहिणी नक्षत्रात ज्या वेळी सोलापूर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली त्याच कालावधीत राज्यावर निसर्ग वादळाचे संकट घोंघावत होते.
निसर्ग वादळामुळे जिल्ह्याच्या विविध भागात पाऊस झाला. आता निसर्ग वादळ संपले आणि त्यासोबत सोलापूर जिल्ह्यातून पाऊसही गायब झाला आहे.
रोहिणी नक्षत्रात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील खरिपाच्या पेरण्यांसाठी मशागतीला वेग आला होता. मृग नक्षत्रात झालेला पाऊस खरिपाच्या पेरणीसाठी योग्य मानला जातो. रविवारी, आज मृग नक्षत्रातील पावसाने सोलापूर जिल्ह्याकडे पाठ फिरवली आहे.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सोलापूर शहर व जिल्ह्याच्या कमाल तापमानात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे उकाडा आणि उन्हाचा चटका पुन्हा एकदा वाढू लागला आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: