सोलापूर, १८ ऑगस्ट २०२३ : सोलापूर एसटी स्थानकांत गेल्या काही दिवसांपासून चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. एसटीमध्ये चढताना अथवा उतरताना गर्दीचा फायदा घेऊन चोरटे प्रवाशांचे मौल्यवान वस्तूसह दाग-दागिन्यांवर डल्ला मारत आहेत. एसटी स्थानकांत कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक अथवा पोलीस कर्मचारी तैनात नसल्याने स्थानक परिसरात चोरांचा वावर वाढला आहे.
सलग सुट्या व अधिकमासाचे औचित्य साधून नागरिक देवदर्शन, पर्यटनासाठी बाहेर पडले आहेत. तसेच राज्य शासनाच्या महिला सन्मान योजनेमुळे महिलांचा वर्ग एसटीला प्राधान्य देत आहेत. याचाच फायदा घेत चोरटे स्थानक परिसरात पाळत ठेवून चोऱ्या करत आहेत. स्थानकात एसटी येताच चोरट्यांचा एक गट एसटीच्या दरवाजा जवळ गर्दी करुन उभे राहतात. यामध्ये महिला चोरट्यांचे प्रमाण अधिक आहे.
प्रवाशांची संख्या लक्षात घेता एसटी स्थानकांत पुरेशी सुरक्षा यंत्रणा नसल्यामुळे हा प्रकार दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. स्थानकांत सीसीटीव्ही कॅमेर्याची संख्या वाढवणे गरजेचे आहे. तसेच कायमस्वरूपी पोलीस व सुरक्षा रक्षक तैनात करण्यात यावे, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येतेय. तर चोरी झाल्यास तत्काळ तक्रार दाखल करावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर