सोलापूर २४ नोव्हेंबर २०२३ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सामाजिक शास्त्र संकुलातील मास कम्युनिकेशन विभागातर्फे, दि.२८ नोव्हेंबर २०२३ रोजी विज्ञान, पर्यावरण आणि विकास पत्रकारितेतील नवे प्रवाह या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील परिषदेचे आयोजन तसेच २९ नोव्हेंबर २०२३ रोजी विद्यार्थी मेळाव्याचेही आयोजन करण्यात आल्याची माहिती, विभाग प्रमुख डॉ.रवींद्र चिंचोलकर यांनी दिली.
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर, मास कम्युनिकेशन विभागातील माजी विद्यार्थ्यांची ‘सुसंवाद’ संघटना तसेच सोलापूर विज्ञान केंद्र, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे. विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्रे संकुलातील सभागृहात होणा-या या राष्ट्रीय परिषदेसाठी देशभरातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या परिषदेचे उदघाटन दि.२८ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी साडेदहा वाजता यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठावचे माजी कुलगुरु प्रा. सुधीर गव्हाणे यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थान सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक डॉ.प्रा. जी.एस.कांबळे हे भूषविणार आहेत. या कार्यशाळेत विजापूर येथील कर्नाटक स्टेट युनिवर्सिटीचे माजी कुलगुरु प्रा.ओंकार काकडे, ज्येष्ठ पत्रकार यमाजी मालकर, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील मास कम्युनिकेशन विभागाच्या प्रमुख डॉ. निशा पवार, नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विदयापीठातील कम्युनिकेशन स्टडीज विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र गोणारकर, मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठातील डेव्हलपमेंट कम्युनिकेशन विभागाच्या प्रमुख डॉ.मीरा देसाई, मध्य प्रदेशातील माखनलाल चतुर्वेदी विदयापीठाच्या रेवा कॅम्पसचे डॉ.संदीप भट, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वृत्तविदया विभागातील प्रा.योगेश बोराटे, जळगाव येथील ज्येष्ठ पत्रकार पंकज पाटील, शिवाजी विदयापीठ कोल्हापूरचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर, विज्ञान केंद्राचे संचालक राहुल दास, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे आदी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमात मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर यांच्या ‘सोशल मिडिया फॉर पार्टिसिपेटरी डेव्हलपमेंट’ या ग्रंथाचे प्रकाशन प्रा.सुधीर गव्हाणे यांच्या हस्ते होणार असून डॉ.मीरा देसाई या ग्रंथाबाबत भाष्य करणार आहेत. नवी दिल्ली येथील ग्यान पब्लिकेशनने हा ग्रंथ प्रकाशित केला आहे. दुपारच्या सत्रात सोलापूर जिल्हयाच्या विकासाबाबत वृत्तपत्रांची भूमिका या विषयावर ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यात विविध वृत्तपत्रांचे संपादक भूमिका मांडणार आहेत. कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर आणि कुलसचिव योगिनी घारे यांच्या मार्गदर्शनाखाली या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास जास्तीत जास्त विद्यार्थी , अभ्यासक, नागरिक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन विदयापीठातर्फे करण्यात आले आहे.
२९ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ११ पासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात सकाळच्या सत्रात सामाजिक शास्त्रे संकुलातर्फे डॉ.रवींद्र चिंचोलकर यांचा सत्कार करण्यात येणार आहे. दुपारच्या सत्रात सुसंवाद विदयार्थी संघटनेतर्फे मास कम्युनिकेशन विभागाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांचा मेळावा होणार आहे. यात डॉ.रवींद्र चिंचोलकर यांच्या गौरव ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे. या कार्यक्रमास माजी संचालक डॉ. इ.एन.अशोककुमार, पुरातत्वशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ.माया पाटील, डॉ.प्रभाकर कोळेकर, पुणे येथील गोखले संस्थेचे डॉ.प्रकाश व्हनकडे , गौरव अंकाच्या संपादक डॉ.निशा पवार, सुसंवाद विदयार्थी संघटनेचे अध्यक्ष जाकीरहुसेन पीरजादे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
न्युज अनकट प्रतिनीधी : डॉ.पंकज पाटील