पुणे, ११ सप्टेंबर २०२२: नासाच्या सूर्याभोवती फिरणाऱ्या एका यानाने ५ सप्टेंबर रोजी अद्भुत घटना कॅमेऱ्यात कैद केली असून त्यानुसार सध्या सूर्यापासून वादळे, उच्च-वेगवान कण आणि कोरोनल मास इजेक्शन सतत बाहेर पडत आहे. सूर्याच्या आंतरिक भागात होणाऱ्या चुंबकीय बदलांमुळे त्याच्या पृष्ठभागावर होणाऱ्या स्फोटांना सौरस्फोट असे म्हणतात यामुळे सूर्याच्या पृष्ठभागावर सौरडाग तयार होत असून सौरडागांचे प्रमाण वाढणे आणि कमी होण्याच्या चक्राला सौरचक्र असे म्हणतात. या वेळी सूर्याचा दक्षिण आणि उत्तर ध्रुव एकमेकांची जागा बदलत असतात. हे साधारण दर ११-१२ वर्षांनी होत असते.
सौर वादळाचा मानवी शरीरावर प्रत्यक्ष परिणाम अजून आढळून आला नसला तरी पृथ्वीवरील संदेशवहन यंत्रणा, वीजपुरवठा, उत्तर किंवा दक्षिण ध्रुवावर कधी-कधी दिसणाऱ्या रंगबेरंगी प्रकाश शलाका यांच्यावर मात्र परिणाम होतो. तसेच मोठ्या सौरवादळांच्या ध्रुवाजवळून उड्डाण करणाऱ्या विमानांच्या दिशानिर्देशन प्रणालीवरही परिणाम होतो. त्यामुळे त्यांना लांब अंतरावरून जाण्यास सांगण्यात येते.
जितके सौर डाग जास्त, तितकी सौर वादळे जास्त व परिणामी सूर्याकडून पृथ्वीकडे येणारी ऊर्जा जास्त असे ढोबळमानाने म्हणता येईल.
न्यूज अनकट प्रतिनिधी: सुरज गायकवाड