गोल पोस्ट महाराष्ट्र जवान वैभव भोईटे यांना फलटणमध्ये शासकीय इतमामात हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत साश्रुपुर्ण नयनांनी...

जवान वैभव भोईटे यांना फलटणमध्ये शासकीय इतमामात हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत साश्रुपुर्ण नयनांनी अखेरचा निरोप

फलटण, सातारा २२ ऑगस्ट २०२३ : लडाख येथील लेह जवळ वाहन अपघातात वीर मरण प्राप्त झालेल्या वैभव संपतराव भोईटे (वय ३१ वर्षे) यांना भोईटे वस्ती, राजाळे ता. फलटण येथे शासकीय इतमामात मानवंदना देण्यात आली. यावेळी हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत साश्रुपुर्ण नयनांनी वैभव भोईटे यांना अखेरचा निरोप दिला. त्यांच्या कुटूंबीयांनी केलेला आक्रोश पाहुन अनेकांना अश्रु अनावर झाले. भोईटे यांना वडिल संपतराव भोईटे यांनी व त्यांची छोटी दिड वर्षाची मुलगी हिंदवी यांनी भडाग्नी दिला.

लडाखमधील लेह जिल्ह्यात राजधानी लेह जवळ कॅरी गावातुन जाणारे, भारतीय लष्कराचे वाहन खोल दरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत नऊ जवानांचा मृत्यू झाला होता. या शहीद झालेल्या जवानांमध्ये राजाळे ता. फलटण येथील वैभव संपतराव भोईटे (वय २३ वर्षे) या जवानाचा समावेश असल्याचे वृत्त फलटण तालुक्यात व राजाळे या गावी समजताच संपुर्ण तालुक्यावर शोककळा पसरली. सोमवारी राजाळे गावाने संपुर्ण बाजार पेठ बंद ठेवून व नागपंचमीचा सण साजरा न करुन श्रध्दांजली वाहिली. हुतात्मा वैभव भोईटे यांचे पार्थीव लेहवरुन दिल्ली, हैद्राबाद मार्गे पुणे येथे विमानाने आणण्यात आले. पुणे येथुन विशेष वाहनातुन राजाळे येथे आणण्यात आले. लोणंद ते फलटण व फलटण ते राजाळे या मार्गावरील प्रत्येक गावामध्ये रस्त्याच्या दुतर्फा व मध्यभागी रांगोळी काढण्यात आली होती. गावोगावी भोईटे यांना श्रध्दांजली वाहणारे होर्डिंग्स लावण्यात आले होते.

राजाळे येथे भोईटे यांच्या पार्थीवाचे आगमन सायंकाळी आठ वाजता झाले. तेथुन भोईटे वस्ती येथे फुलांनी सजविलेल्या ट्रॉलीतुन साडे आठच्या सुमारास निवासस्थानी आणण्यात आले. यावेळी वीर जवान वैभव भोईटे अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम, जब तक सुरज चाँद रहेगा वैभव तेरा नाम रहेगा, इनक्लाब जिंदाबाद आशा घोषणांनी आसमंत निनादला. राजाळे येथुन भोईटेवस्ती येथे त्यांच्या निवासस्थानी पार्थीव मुख दर्शनासाठी आणल्यानंतर त्यांची आई, वडिल, पत्नी व कुटूंबियांनी हंबरडा फोडला, त्यांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. यावेळी ऊपस्थित हजारो लोकांनाही अश्रु अनावर झाले होते.

भोईटे यांच्या निवासस्थानापासुन नजिक असणार्या मोकळ्या पटांगणावर वीर जवान भोईटे यांचे पार्थीव ठेवण्यासाठी फुलांनी सजविलेले विशेष स्टेज करण्यात आले होते. तेथे हजारोंच्या जनसमुदायाने त्यांच्या पार्थीवाचे अंत्यदर्शन घेतले. यानंतर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार दिपकराव चव्हाण, सातारा जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्यावतीने प्रांत अधिकारी सचिन ढोले, पोलिस उपअधिक्षक राहूल धस, राजाळे सरपंच सौ. स्वाती दोंदे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भाऊसो काळे, माजी सनदी आधिकारी विश्वासराव भोसले, जिल्हा सैनिक मंडळ, कमांडींग अॉफिसर ३११ मेडियम रेजिमेंट, कमांडींग आॉफिसर २४ मराठा, कर्नल अॉफ दि रेजिमेंट मराठा, जी ओसी महाराष्ट्र ॲन्ड गोवा, जी ओसी डी एम ॲन्ड जी एस एरीया, जीओसी इन सी हेडक्वार्टर साऊथर्न कमांड, चीफ अॉफ आर्मी स्टाफ, मेकनाईझ रेजिमेंटच्या अधिकार्यांसह विविध पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांनी पुष्पचक्र वाहून श्रध्दांजली अर्पण केली.

पोलिस प्रशासन व सैन्य दलाच्यावतीने प्रत्येकी तिन फैर्या हवेत झाडून मानवंदना देण्यात आली. यानंतर ज्या तिरंग्यात लपेटून वैभव यांचे पार्थीव आणण्यात आले तो तिरंगा त्यांच्या कुटूंबियांना सुपुर्द करण्यात आला. यानंतर त्यांच्या पार्थीवास वडिल संपतराव भोईटे यांनी व कडेवर बसलेल्या दिड वर्षाची मुलगी हिंदवी यांनी भडाग्नी दिला. यावेळी आजी माजी सैनिक संघटना, विविध पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक व सेवाभावी संघटनांचे प्रतिनिधी फलटण तालुक्यातील नागरिक, महिला मोठ्या संखेने उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : आनंद पवार

error: Content is protected !!
Exit mobile version