मुंबई, २२ ऑगस्ट २०२३ : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाल्यानंतर, यावर तोडगा काढण्यासाठी राज्यातील सर्वच मंत्री कामाला लागले आहेत. एकिकडे कृषीमंत्री धनंजय मुंडे हे दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीवर गेले आहेत, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जपान दौऱ्यावर असतानाही केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याशी संपर्क केला आहे. यातुन राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न फडणवीस यांनी केला आहे. केंद्र सरकारने २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमितशाह तसेच केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याशी जपानमधून दूरध्वनीवर संपर्क केला. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली.
केंद्र सरकार महाराष्ट्रातून २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार आहे. तसेच त्यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे दोन खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. केंद्र सरकार २४१० प्रतिक्विंटल या दराने कांदा खरेदी करेल.
या संदर्भात देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नासाठी आज आमचे नेते केंद्रीय गृहमंत्री मा.अमितभाई शाह तसेच केंद्रीय मंत्री मा.पियुष गोयलजी यांच्याशी जपानमधून दूरध्वनीवर संपर्क केला. आता केंद्र सरकारने २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे हित जपण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील, अशी घोषणा त्यांनी केली आहे. ₹२४१० प्रतिक्विन्टल या दराने ही खरेदी करण्यात येईल. यातून मोठा दिलासा आपल्या राज्यातील कांदा उत्पादकांना मिळेल.
एकीकडे राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे हे कांदा प्रश्ननी तोडगा काढण्यासाठी वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी पोहोचले आहेत. दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट कांदा प्रश्न यावर तोडगा निघाल्याचे जाहीर केले. यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट जपानमधून केंद्रीय मंत्री अमित शाह आणि पियुष गोयल यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. काही वेळापूर्वीच कांदा प्रश्नी तोडगा काढल्याचं सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्विट करत त्यांनी जाहीर केलं. त्यामुळं एकंदरीतच अजित पवार गटावर सरशी करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी तर केला नाही ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे. तात्काळ केंद्र सरकारने निर्यात शुल्क रद्द करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा मुद्दा लक्षात घेता कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्लीला जाऊन केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांची भेट घेतली. यानंतर केंद्र सरकार २ हजार ४१० रुपये प्रतिक्विंटल भावाने नाफेड मार्फत शेतकऱ्यांचा दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार असल्याची माहिती मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. धनंजय मुंडे यांनी ट्वीटरद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे
