मावळ तालुक्यातील पिंपरी-चिंचवड शहराच्या सीमेवर असलेला आणि वाढत्या शहरीकरणामुळे ‘सर्वात सधन‘ ओळखला जाणारा सोमाटणे-चांदखेड जिल्हा परिषद गट यावेळी चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. मागील निवडणुकीतील इंदोरी-सोमाटणे आणि महागाव-चांदखेड या दोन गटांचे विभाजन होऊन या नव्या गटाची निर्मिती झाली आहे. त्यामुळे येथील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.
सोमाटणे, शिरगाव, गहुंजे येथील उच्चभ्रू सोसायटीतील मतदार आणि दुसऱ्या बाजूला ग्रामीण मतदार असा या गटाचा ‘कॉम्बिनेशन‘ आहे. उर्से येथील औद्योगिक क्षेत्र, गहुंजेचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम आणि प्रस्तावित रिंगरोड यामुळे हा गट मावळमध्ये महत्त्वाचा ठरतो. या गटात एकूण ४५,७७५ मतदार असून, त्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
या गटासाठी ‘सर्वसाधारण स्त्री‘ प्रवर्गाचे आरक्षण जाहीर झाल्याने अनेक इच्छुकांनी आता त्यांच्या सौभाग्यवतींना रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, निवडणुकीत ‘महायुती‘ फिसकटली तर या सधन गटात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थेट आणि अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे. मागील निवडणुकीत सोमाटणे गणात राष्ट्रवादीचे तर चांदखेड गणात भाजपचे उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळे आता या नव्या आणि आकर्षक गटात कोण बाजी मारणार, याकडे मावळवासियांचे लक्ष लागले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे













































