गोल पोस्ट गुन्हा कौटुंबिक वादातून मुलाकडून आई, पत्नीला गोळ्या घालण्याची धमकी; पाथर्डी तालुक्यातील घटना

कौटुंबिक वादातून मुलाकडून आई, पत्नीला गोळ्या घालण्याची धमकी; पाथर्डी तालुक्यातील घटना

पाथर्डी, २५ जानेवारी २०२३ : वडील आईला मारहाण करीत असताना सून सासूच्या मदतीला धावली. बाजूलाच असलेल्या मुलाने पत्नीला मदतीला आली म्हणून मारहाण केली. माझ्या वडिलांच्या नादी लागल्या तर दोघींना गोळ्या घालून ठार मारून टाकीन, अशी धमकी त्याने आई आणि पत्नीला दिली. पाथर्डी तालुक्यातील माळीबाभूळगाव येथे ही घटना घडली. आईच्या फिर्यादीवरून पोलिसांत बाप-लेकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नी व सुनेला शिवीगाळ केली. पत्नीला लोखंडी पाईपने मारहाण केली. सासूच्या मदतीला सून धावली. सासरा घरातून पिस्तूल घेऊन आला. त्याने पिस्तूलच्या मुठीने पाठीत सासूला मारहाण केली. हा प्रकार सुरू असताना पीडितेचा मुलगा हा तेथे आला आणि त्याने त्याच्या पत्नीला तू येथे कशाला आली म्हणून मारहाण केली.

सासूने मुलाच्या मारहाणीतून सुनेची सुटका केली. मुलाने घरातून गावठी कट्टा आणला. आई व पत्नीला दाखवत म्हणाला, की परत माझ्या वडिलांच्या नादी लागल्या तर दोघींना गोळ्या घालून ठार मारून टाकीन, अशी धमकी दिली. बापाकडे लायसनधारी पिस्तूल, तर मुलाकडे गावठी कट्टा असल्याने सासू-सून घाबरल्या होत्या.

जीव मुठीत धरून त्यांनी रात्र कशीबशी काढली आणि आज सकाळी घरातील गावठी कट्टा घेऊन त्या पाथर्डी पोलिस ठाण्यात पोचल्या. पोलिसांनी कट्टा जमा करून गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version