सोनेगाव येथील गणेश ढाकणे यांच्या घराजवळील कोंबड्यांच्या बेंड्यामध्ये अचानक मोठा अजगर साप दिसला. सकाळी कुटुंबीयांना कोंबड्यांची धावपळ आणि ओरड ऐकू आली. तपासल्यावर बेंड्यात अजगर अडकलेला आढळला. घाबरलेल्या नागरिकांनी पवन कौरसे यांच्या माध्यमातून स्थानिक सर्पमित्र रंजीत मडावी यांना कळवले. काही क्षणांतच सर्पमित्र विशाल मडावी, रंजीत मडावी, सूरज कुमार आणि नवनीत मसराम घटनास्थळी पोहोचले. त्यांनी साधनसामुग्री वापरून सावधगिरीने अजगर बाहेर काढला.
सुमारे ८-९ फूट लांबीचा हा अजगर दमछाक झाला होता. सर्पमित्रांनी त्याला पिंजर्यात ठेवून सुरक्षित केले आणि नंतर वनविभागाच्या मार्गदर्शनानुसार जवळील जंगलात सोडले.
रंजीत मडावी यांनी नागरिकांना आवाहन केले, “मानव आणि वन्यजीवांमध्ये संघर्ष टाळण्यासाठी घाबरून न जाता सर्पमित्रांना संपर्क करा.” या धाडसी कार्यामुळे स्थानिकांनी सर्पमित्रांचे कौतुक केले आणि एक मोठी अपघात टळल्याची भावना व्यक्त केली.
न्यूज अनकट प्रतिनिधी ध्रुव पाटील