सोनू सूद देणार तीन लाख लोकांना रोजगार 

मुंबई, दि. ३० जुलै २०२०: प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता सोनू सूद आता तीन लाख लोकांना नोकऱ्या देणार आहे. सोनू सूदने ”प्रवासी रोजगार” नावाचं एक संकेतस्थळ लॉन्च केलं असून त्यानं ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे.
आज सोनू सूदचा वाढदिवस असल्यानं देशभरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर तो लोकप्रिय तर आहेच, मात्र गेल्या काही महिन्यांत केलेल्या समाजसेवेनं तो अनेकांचा फेव्हरेट झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात २४ मार्चला अचानक लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे हातावर पोट असलेले अनेक परप्रांतीय मजूर हे देशाच्या अनेक भागांत अडकले होते. विशेष करून महाराष्ट्रात उत्तर प्रदेश, बिहार यांसारख्या राज्यातले लाखो मजूर अडकले.

लॉकडाऊनमुळे रेल्वेसेवा, बससेवा बंद आणि त्यात पुरेसे पैसे नसल्यानं हे मजूर हवालदिल झाले होते. मात्र सोनू सूदने पुढे येत या मजुरांना आपापल्या गावी जाण्यासाठी मोफत व्यवस्था केली आणि सोनू सूद प्रवासी मजदुरांचा हिरो ठरला.

आता त्याने या श्रमिकांना रोजगार देण्यासाठी ”प्रवासी रोजगार” नावचं जॉब पोर्टल लॉन्च केलं आहे. याद्वारे सुमारे तीन लाख लोकांना रोजगार देण्यात येईल असं त्याने सांगितलं. विशेष म्हणजे आज त्याचा वाढदिवस आहे आणि याच दिवशी त्याने ही मोठी घोषणा केली आहे. त्यासोबतच सोनू सूदने AEPC, CITI, Trident, Quess Corp, Amazon, Sodexo, Urban Co , Portea यांसारख्या मोठ्या कंपन्यांसोबत करार केला असल्याचं सांगत या कंपन्यांचे आभार मानले.

सोबतच सर्वांना चांगलं वेतन, पीएफ, ईएसआय यांसारख्या अनेक सुविधा देण्यात येतील असंही आश्वासन सोनू सूदने दिलं आहे. त्याचप्रमाणे #AbIndiaBanegaKamyaab  या हॅशटॅग खाली त्याने ही पोस्ट केली असून  www.pravasirojgar.com हे संकेतस्थळ त्याने शेअर केलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा