मुंबई, दि. ३१ जुलै २०२०: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिनेता सोनू सूदच्या समाजसेवेचं कौतुक केलं. मात्र हे त्याच्या एकट्याचं डोकं नाही असा चिमटाही काढला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंनी सोनू सूद करत असलेल्या कामांबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे.
२४ मार्चच्या लॉकडाऊनमुळे लाखो परप्रांतीय मजुरांचे हाल झाले होते. या सर्वांना आपापल्या गावी पोहोचवण्यासाठी अभिनेता सोनू सूदने बरीच कामे केली. त्यानंतर कालच सोनू सूदने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रवासी रोजगार नावाचं जॉब पोर्टल लॉन्च केलं.
सोबतच आता गणेशोत्सवासाठी भक्तांना कोकणात जाण्यासाठी तो गाड्यांची व्यवस्था करणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र ही सगळी कामं करण्यासाठी सोनू सूदकडे एवढा पैसा आला कुठून असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
राज ठाकरे यांनी देखील याबद्दल शंका उपस्थित केली आहे. ते म्हणाले कि, सोनू सूद चांगलं काम करतोय त्याबाबत दुमत नाही, परंतु चांगलं काम करण्याची इच्छा सगळ्यांची असते तरीही आर्थिक परिस्थितीमुळे ते करता येत नाही. सोनू सूदचं हे एकट्याचं डोकं नाही. सोनूला आर्थिक पाठबळ कुणाचं आहे पुढे जाऊन कळेल. अशा शब्दात राज ठाकरेंनी शंका व्यक्त केली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अक्षय बैसाणे












































