हैद्राबाद, १९ फेब्रुवारी २०२३ :दाक्षिणात्य अभिनेते तसेच ज्युनिअर एनटीआर यांचे चुलत बंधू नंदामुरी तारका रत्न यांचे निधन झाले आहे. वयाच्या ३९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनाने दाक्षिणात्य सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. प्रसिद्ध अभिनेते अल्लु अर्जुन, चिरंजीवीसहीत अनेक अभिनेत्यांनी आणि नंदामुरी यांच्या चाहत्यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
नंदामुरी यांना २७ जानेवारीला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना कुप्पम येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी कुटुंबियांसोबत चाहतेदेखील प्रार्थना करत होते. पण उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खलावल्यामुळे त्यांचे निधन झाले.
दरम्यान, नंदामुरी यांनी राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी तेलुगु सिनेमातून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. ओकाटो नंबर कुर्राडु हा त्यांचा पहिला सिनेमा होता. मात्र, त्यांना आपले चुलत भाऊ ज्युनिअर एनटीआर यांच्यासारखं फिल्मी जगात मोठे यश मिळाले नाही.
- चिरंजीवी यांचे ट्विट :
नंदामुरी तारक रत्न यांचे अचानक निधन झाल्याचे ऐकून खूप दु:ख झाले. उज्ज्वल प्रतिभावंत, स्नेही, तरुण अभिनेता फार लवकर गेला. त्याच्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना आहेत. ईश्वर त्याच्या आत्म्यास शांती देवो, असे ट्विट करत चिरंजीवीने शोक व्यक्त केला आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.