नवी दिल्ली, १७ फेब्रुवरी २०२१: कोरोना विषाणूच्या यूके व्हेरिएंटनंतर आता दक्षिण आफ्रिका आणि ब्राझिलियन व्हेरिएंटची भीती निर्माण झाली आहे. आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव म्हणाले की, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सार्स-कोव्ह -२ चे ब्राझिलियन व्हेरिएंट सापडले आहे. लसीच्या प्रभावीतेचे मूल्यांकन करण्यासाठी प्रयोग सुरू आहेत. दक्षिण आफ्रिका आणि ब्राझिलियन व्हेरिएंट यूकेच्या व्हेरिएंटपेक्षा भिन्न आहेत असेही ते म्हणाले.
इंडियन सेंटर फॉर मेडिकल रिसर्चचे (आयसीएमआर) महासंचालक बलराम भार्गव म्हणाले की, दक्षिण आफ्रिकेतून परत आलेल्या ४ लोकांमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या स्ट्रेन असल्याची खात्री पटली आहे. सर्व प्रवाशांचे आणि त्यांच्या संपर्कातील लोकांची चाचणी करून त्यांना अलग ठेवण्यात आले आहे. याशिवाय ब्राझीलच्या व्हेरिएंटशी संबंधित एक प्रकरण देखील निदर्शनास आले आहे.
आतापर्यंत यूके व्हेरिएंटची १८७ प्रकरणे: आयसीएमआर
ते म्हणाले की, आतापर्यंत देशात यूके व्हेरिएंटची १८७ प्रकरणे आहेत. यूके व्हेरिएंटमध्ये संक्रमित झालेल्यांपैकी कुणाचा मृत्यू झाला नाही. सर्व सकारात्मक प्रकरणे अलग ठेवण्यात आली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जे त्यांच्या संपर्कात आले त्यांना अलग ठेऊन त्यांची चाचणीही घेण्यात आली आहे. आपल्या जवळ उपलब्ध असलेल्या लसमध्ये देखील यूके व्हेरिएंट अकार्यक्षम करण्याची क्षमता आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे