उस्मानाबाद, १७ ऑगस्ट २०२०: सोयाबीन हे जिल्ह्याचे मुख्य पीक असून सोयाबीन पिकाची परिस्थिती सध्या समाधानकारक आहे. यामुळे, सोयाबीन पीक उत्पादक शेतकऱ्यांनी पिकांवर कीटकनाशकाची फवारणी करावी, असा सल्ला कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिलेला आहे.
जिल्ह्यात चांगला पाऊस पडलेला नसला तरी पिकासाठी उपयुक्त ठरेल एवढा जेमतेम चांगला पाऊस झालेला आहे. तसेच, मागील आठवड्यापासून जिल्ह्यात सर्वदूर ढगाळ वातावरण आहे. पुढील तीन ते चार दिवस असेच ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. हे वातावरण किडींचा प्रादूर्भाव वाढण्यासाठी पोषक आहे. त्यातच, मंगळवार दिनांक १८ ऑगस्ट रोजी अमावस्या आहे. सर्वसाधारणपणे हानीकारक किडीचे पतंग हे अमावस्येच्या दिवशी किंवा एक दोन दिवस मागे पुढे मोठ्या प्रमाणावर अंडी घालतात.
त्यामुळे, अळ्यांचा/ किडींचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणावर होऊन नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. तसेच, सध्या पीक फुलोरा व शेंगा लागण्याच्या अवस्थेत असून किडीचा प्रादूर्भाव झाल्यावर मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते. म्हणून, खबरदारीचा उपाय म्हणून शेतकऱ्यांनी कीटकनाशकाची फवारणी पिकांवर करून घ्यावी, असा सल्ला जिल्हा कृषी विभागाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलेला आहे.
ही शेवटची फवारणी केली, तर निश्चित फुलांचे व लागलेल्या कोवळ्या शेंगांचे पक्व शेंगांमध्ये रुपांतर होऊन चांगले उत्पादन मिळण्याची शक्यता असल्याचे कृषी विभागाने म्हंटले आहे. तरी बदललेल्या हवामानानुसार शेतकऱ्यांनी आवश्यकतेप्रमाणे पिकांवर कीटकनाशकाची फवारणी करावी आणि होणारे नुकसान टाळावे, असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केलेले आहे.
न्यूजअनकट प्रतिनिधी: प्रगती कराड