मुंबईत मृत्यू झालेल्या स्पॅनिश महिलेने वाचविले पाच जणांचे प्राण; हृदयापासून हाडांपर्यंत सर्व काही केले दान

मुंबई, १३ जानेवारी २०२३ : एका मृत स्पॅनिश महिलेने मुंबईत पाच जणांचे प्राण वाचविले आहेत. येथील जसलोक रुग्णालयात एका महिलेवर उपचार सुरू होते. तिला डॉक्टरांनी ब्रेनडेड घोषित केले. अवयवदानासाठी ६७ वर्षीय महिलेच्या कुटुंबीयांच्या संमतीनंतर चार भारतीय आणि एका लेबनीज नागरिकाचे प्राण वाचले. स्पेनची महिला तेरेसा मारिया फर्नांडिझ भारत दौऱ्यावर आली होती. मुंबईत ता. ५ जानेवारीला रक्तस्रावाचा झटका आला होता. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तेरेसा मारिया फर्नांडिझ यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नसल्याने जसलोक रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना ब्रेनडेड घोषित केले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर महिलेचे कुटुंबीयही मुंबईत पोचले होते. स्पॅनिश महिलेची मुलगी या व्यवसायाने डॉक्टर असून, त्यांनी आईची अवयवदान करण्याची इच्छा डॉक्टरांना सांगितली.

दरम्यान, रिजनल कम स्टेट ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशननुसार, महिलेचे फुफ्फुस, यकृत आणि मूत्रपिंड भारतीय रुग्णांना देण्यात आले आहे, तर हृदय लेबनीज नागरिकाला देण्यात आले आहे. त्यांच्या अस्थीही दान करण्यात आल्या आहेत. त्यांचे यकृत मुंबईतील ५४ वर्षीय डॉक्टरांना देण्यात आले असून, त्यामुळे त्यांचे प्राण वाचले आहेत. २०१९ पासून त्यांना हृदयविकार होता. नानावटी रुग्णालयातील हिपॅटोलॉजी आणि ट्रान्सप्लांट मेडिसीनचे कार्यक्रम संचालक डॉ. चेतन कलाल यांच्या हस्ते प्रत्यारोपण करण्यात आले.

जसलोक रुग्णालयाचे डॉ. आंबेडकर म्हणाले, की एका स्पॅनिश महिलेच्या कुटुंबाकडून लोकांनी शिकले पाहिजे, ज्याने बिनदिक्कत आपले अवयव दान केले, तेही दुसऱ्या देशातील अनोळखी व्यक्तीला. डॉक्टरांनी सांगितले, की आम्ही त्यांच्याकडे डोनेशनसाठी संपर्कही केला नाही. त्यांनी स्वतः त्यासाठी होकार दिला. भौगोलिक सीमा मानवतेला रोखू शकत नाहीत, हे त्यांनी दाखवून दिले.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा