मणिपूरवर बोलतांना पंतप्रधान मोदींकडून काँग्रेस कार्यकाळातील घटनांचा उल्लेख, आमच्यासाठी ईशान्य भारत म्हणजे यकृताचा तुकडा आहे

नवी दिल्ली, ११ ऑगस्ट २०२३ : मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर विरोधकांनी लोकसभेत आणलेल्या अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिले. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले की, अविश्वास प्रस्तावाची ताकद आहे की, आपण पंतप्रधान मोदींना सभागृहात खेचून आणले. मंगळवारपासून अविश्वास ठरावावर सभागृहात जोरदार चर्चा आणि खडाजंगी सुरू आहे. बुधवारी काँग्रेसच्या वतीने राहुल गांधी यांनी चर्चेत भाग घेतला. मणिपूर हिंसाचारावर त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. राहुल गांधी यांनी मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या झाल्याचे म्हटले होते. त्यावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि नंतर अमित शहा यांनी राहुल गांधी यांना जोरदार प्रत्यूत्तर दिले.

पंतप्रधान मोदी यांनी अविश्वास ठरावावर उत्तर देत असताना मागील काळातील घटनांचा उल्लेख केला. मोदी हे ईशान्येला देशाचा भाग मानत नाहीत, असा आरोप विरोधी पक्षांनी केला होता. यावर उत्तर देताना पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेस कार्यकाळातील घटनांचा उल्लेख केला. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, ५ मार्च १९६६ रोजी मिझोराममधील असहाय नागरिकांवर हल्ला करण्यासाठी काँग्रेसला हवाई दल मिळाले. मिझोरामचे लोक भारताचे नागरिक नव्हते का म्हणून काँग्रेसने निष्पाप नागरिकांवर हल्ले केले होते. आजही पाच मार्चला संपूर्ण मिझोरममध्ये शोक दिवस पाळला जातो. काँग्रेसने हे सत्य लपवले, जखम भरण्याचा प्रयत्न कधी केला नाही. त्यावेळी इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या.

१९६२ मध्ये चीनने हल्ला केला त्यावेळचे ते भितीदायक प्रसारण लक्षात ठेवा. चीनकडून देशावर हल्ले होत होते. लोकांना मदतीची अपेक्षा होती. अशा कठीण काळात पंडित नेहरू म्हणाले होते की, माझे हृदय आसामच्या लोकांसाठी जाते. नेहरूंनी तेथील लोकांना त्यांच्या नशिबावर जगायला सोडले होते.

पुढे बोलताना मोदी म्हणाले की, जे स्वत:ला लोहियांचे वारसदार ठरवतात. लोहिया यांनी नेहरूंवर आरोप करत म्हणाले होते की, नेहरू जाणूनबुजून ईशान्येचा विकास करत नाहीत. ती जागा सर्व प्रकारच्या विकासापासून वंचित राहिली आहे. मोदी पुढे म्हणाले की, ज्या ठिकाणी लोकसभेच्या एक-दोन जागा होत्या तीकडे काँग्रेसने लक्ष दिले नाही. पण आमच्यासाठी ईशान्य म्हणजे यकृताचा तुकडा आहे. ईशान्य, मणिपूरमधील सद्यस्थितीला काँग्रेसच कारणीभूत असल्याचे मोदी म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा