‘७२ हुरैन’चं जेएनयूच्या कॅम्पसमध्ये होणार विशेष स्क्रीनिंग, निर्मात्यांचा मोठा निर्णय

दिल्ली, २ जुलै २०२३: संजय पूरण सिंग दिग्दर्शित ७२ हुरैन हा चित्रपट काही दिवसातच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. टीझर समोर आल्यापासून या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. दरम्यान, आता निर्मात्यांनी एक मोठी घोषणा केली की, दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) ७२ हुरैनचे विशेष स्क्रीनिंग होणार आहे. निर्मात्यांच्या या घोषणेनंतर हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हे स्क्रिनिंग जेएनयूमध्ये ४ जुलैला होणार आहे.

जूनच्या सुरुवातीला निर्मात्यांनी या चित्रपटाचा टीझर रिलीज केला होता आणि त्यानंतर २८ जून रोजी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. अजमल कसाब, ओसामा बिन लादेन, हाफिज सईद अशा अनेक दहशतवाद्यांची झलक टीझरमध्ये दाखवण्यात आली आहे. निर्मात्यांच्या मते हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटाची कथा लोकांचे ब्रेनवॉश करून त्यांना दहशतवादात कसे आणले जाते यावर आधारित आहे.

अलीकडे हा चित्रपट सीबीएफसी च्या एका निर्णयामुळे खूप चर्चेत होता. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला आधीच मंजुरी दिली होती, पण नंतर ट्रेलरला सेन्सॉर प्रमाणपत्र देण्यास नकार दिला. ट्रेलरमधील काही दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला, त्यानंतर हा ट्रेलर डिजिटल पद्धतीने प्रदर्शित करण्यात आला. किरण डागर, गुलाबसिंग तन्वर, अनिरुद्ध तन्वर हे ७२ हुरैनचे निर्माते आहेत. यासोबतच प्रसिद्ध चित्रपट निर्माते अशोक पंडित यांची सहनिर्मिती या चित्रपटासाठी आहे. रिलीज डेटबद्दल बोलायचे झाले तर हा चित्रपट ७ जुलैपासून थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा