जानेवारी २०२४ पासून स्थलांतरीत मजूरांसाठी स्पेशल ट्रेन धावणार

नवी दिल्ली, २० जुलै २०२३ : भारतीय रेल्वे बोर्ड देशभरातील स्थलांतरीत मजूरांची आणि कर्मचाऱ्यांची गरज लक्षात घेऊन सोय करणार आहे. या समूहासाठी स्वतंत्र रेल्वेची व्यवस्था करण्यात येणार आहे. रेल्वेकडून नॉन-एसी, जनरल दर्जाची ट्रेन सुरु करण्यात येणार आहे. या निर्णयाचा अर्थातच उत्तरेतील राज्यांना मोठा फायदा होईल. या राज्यातील प्रवाशांची यामुळे लांबलचक प्रतीक्षा यादीपासून मुक्तता होईल. तर इतर राज्यातील प्रवाशांना सणासुदीच्या काळात पर्यटनाचा आनंद लुटता येईल. सणासुदीच्या काळात रेल्वेवरील ताण यामुळे कमी होईल. कोरोनानंतर मजूरांना घरी पोहचविण्यात रेल्वेने मोठी भूमिका बजावली होती, यापासून धडा घेत आता ही खास योजना आखण्यात येत आहे.

ही रेल्वे जानेवारी २०२४ पासून धावेल. नवीन रेल्वे ही नॉन एसी एलएचबी कोच असेल. या रेल्वेत केवळ स्लीपर आणि जनरल दर्जाची सुविधा असेल. या रेल्वेचे नाव अजून निश्चित करण्यात आलेले नाही. यापूर्वी कोरोना काळात भारतीय रेल्वेने कर्मचारी, मजूरांसाठी सेवा बजावली होती. रेल्वे बोर्डानुसार, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड, उडीसा, पश्चिम बंगाल, पंजाब, आसाम, गुजरात, दिल्ली, तामिळनाडू, महाराष्ट्र, आंध्र प्रदेशासह इतर राज्यात या नवीन रेल्वे धावतील. उत्तर भारत, विशेषतः बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, उडीसा, आसाम या राज्यातून मजूर, कुशल, अकुशल कामगार, कारागिर, कर्मचारी, अधिकारी वर्ग गुजरात, महाराष्ट्र, गोवा या राज्यात मोठ्या प्रमाणावर स्थलांतरीत होतो. काही जण रोजगार शोधण्यासाठी आंध्र प्रदेश, कर्नाटकपर्यंत जातात.

या राज्यातील स्थलांतरीत मजूरांसाठी खास ट्रेन चालविण्यात येणार आहे. यामध्ये स्लीपर आणि जनरल क्लास असेल. या मायग्रेंट स्पेशल ट्रेनमध्ये कमीत कमी २२ आणि जास्तीत जास्त २६ कोच असतील. विशेष म्हणजे ही ट्रेन वर्षभर सुरु राहील. त्यामुळे मजूरांना आता तिकिटासाठी खटाटोप कराव लागणार नाही. तसेच उभे राहून अवघडत प्रवास करावा लागणार नाही, आता त्यांना जागा मिळेल.

या रेल्वे नियमीत टाईमटेबलमध्ये असतील. त्यामुळे प्रवाशांना या रेल्वेत अगोदरच सीट आरक्षित करता येईल. सध्या या रेल्वेत दोन प्रकारचे कोच असतील. एलएचबी कोच आणि वंदे भारत कोच सेवा असतील. सध्या एकूण २८ प्रकारचे कोच सर्व्हिसमध्ये आहेत. या रेल्वेचे तिकीट स्वस्त असतील. आता जनरल डब्ब्यातील प्रवाशांसाठी स्वस्तात भोजणाची योजना सुद्धा सुरु करण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा