प्रजासत्ताकदिनी दिमाखदार संचलन; जिल्ह्याच्या विकासासाठी शासन कटिबद्ध : पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी, २६ जानेवारी २०२३ : रत्नागिरी जिल्हा सर्वच क्षेत्रांत अग्रणी व्हावा, या दृष्टिकोनातून शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी व रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यानी प्रजासत्ताकदिनी मुख्य सोहळ्यात दिली.

येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर मुख्य शासकीय सोहळा झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी; तसेच जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री या नात्याने शुभेच्छा देताना मला विशेष आनंद होत आहे, असे पालकमंत्री आपल्या भाषणात म्हणाले. राज्यात रत्नागिरीवासीयांइतका उत्साही प्रतिसाद कुठेच नसेल, असे सांगून सोहळ्यात आलेल्या नागरिकांचे अभिनंदन करीत आभार मानले.

भटक्या जाती-जमाती समितीचे माजी अध्यक्ष भिकुजी ऊर्फ दादा इदाते यांना केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कार घोषित केला आहे. ही सर्व जिल्हावासीयांसाठी अभिमानाची बाब आहे, असे सांगून त्यांनी दादा इदाते यांचे अभिनंदन केले.

या दिमाखदार सोहळ्यात पोलिस दलांसह, होमगार्ड, एन.सी.सी., ग्रीन आर्मी आणि कोकणी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या पथकांसह चित्ररथाचे संचलन यावेळी झाले.

पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल यावेळी मंत्रिमहोदयांच्या हस्ते प्रारंभी भिकुजी इदाते यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर गुणवंतांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : जमीर खलफे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा