मुंबई : कोरोना’चा वाढता प्रभाव आणि संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी मुंबई पालिकेने कठोर उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्यांना आता एक हजाराचा दंड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याआधी हा दंड २०० रुपये होता. ‘कोरोना’बरोबरच टीबीसारख्या आजारांसह संसर्गजन्य आजारांना आळा घालण्यासाठी पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
मुंबईतील गर्दीमुळे ‘कोरोना’सह संसर्गजन्य आजारांच्या फैलावाला पोषक वातावरण निर्माण होते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या निर्देशानुसार पालिका आयुक्तांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये बेजबाबदारपणे रस्त्यावर थुंकणाऱ्यांना आळा घालण्यासाठी दंडाच्या रकमेत पाचपट वाढ करण्यात आली आहे.
पालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार याआधी ‘कोरोना’वर उपचार सुरू असलेले कस्तुरबा रुग्णालय, केईएम, सेव्हन हिल्स रुग्णालय आणि क्वारेंटाइन, आयसोलेशन सेंटर परिसरातील वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. याशिवाय मुंबईतील शाळा, मॉल, जिम, स्विमिंग पूल, चौपट्याही बंद करण्यात आल्या आहेत. दरम्यान, अत्यावश्यक सेवा मात्र सुरूच ठेवणार असल्याचेही पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.