निगडी, २४ जानेवारी २०२३ : कोळसा कितीही उगाळला तरी काळाच; परंतु याच काळ्या रंगातून सुंदर कलाकृती तयार होतात तेव्हा कोळसा आणि कलाकार दोघेही ग्रेट असल्याचा अनुभव येतो. ‘Black is Beautiful’ अशी इंग्रजीमधील म्हण सार्थ असल्याचे जाणवते.
कोळसा (कोळसाकांडी) अर्थात ‘चारकोल आर्टस्’चा असाच सुंदर अनुभव युवा चित्रकार करण गायकवाड याचा ‘चारकोल पोर्ट्रेट डेमो’ रविवारी (ता. २२ जानेवारी २०२३) चिंचवडगाव येथील पी. एन. गाडगीळ सभागृहात पाहता आला. टेबलवर त्याने ड्रॉइंग पेपर लावला. लगोलग चारकोल पेन्सिल्स, स्टँप, ब्रश, इरेझर असं साहित्य मांडलं गेलं. त्वरेने रफ स्केच पूर्ण झालं आणि सुरू झाली कोळसाकांडीची जादू!
एक-एक पॅचेस भरले जाऊ लागले, कधी हलका हात, तर कधी जोर देऊन ठसठशीत स्ट्रोक्स उमटू लागले. पेपर स्टँप आणि ब्रशने ब्लेंडिंग सुरू झाले. विविध पॅचेस भरताना एकमेकांत मिसळू नये, याची काळजी घेतली जात होती. रेषा अतिशय काळजीपूर्वक आणि नजाकतीने साकारल्या जात होत्या.
रेफरन्स फोटोवरून चारकोल पोर्ट्रेट कसं साकार होणार, याची उपस्थित रसिकांमध्ये उत्सुकता शिगेला पोचत होती. शेवटचे स्ट्रोक्स, पॅचेस, ब्लेंड्स आणि हायलाइट्स पूर्ण झाले. करण गायकवाडने झोकदार सिग्नेचर स्ट्रोक उमटवला आणि उपस्थित रसिकांनी शिवयोगी पोर्ट्रेटला (कोईम्बतूर, तमिळनाडू येथील प्रसिद्ध शिवयोगी मूर्ती ) टाळ्यांचा कडकडाट करून त्यांच्या चित्रकारीला मोठी दाद दिली!
बी.एस्सी. झालेल्या किरण गायकवाड याने कलेचे कोणतेही औपचारिक शिक्षण घेतले नसून त्याची कलाकारी थक्क करणारी आहे. पुण्यात करणची Karan’s Art Elite Acadamy असून, तिथे तो विद्यार्थ्यांना चित्रकलेचे शिक्षण आणि कलाक्षेत्रासंबंधी मार्गदर्शन देत असतो.
प्रात्यक्षिकानंतर युवा चित्रकार हर्षित पाटील याने साकारलेले संस्कार भारती पिंपरी-चिंचवड समितीचे उपाध्यक्ष मा. प्रफुल्ल भिष्णूरकर यांचे सुंदर पोर्ट्रेट त्यांना भेट दिले. या प्रात्यक्षिक कार्यक्रमाला शहरासह परिसरातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. अर्थात, रविवारची (ता. २२) संध्याकाळ युवा चित्रकार करण गायकवाड याच्या चारकोल कलाकारीने सुंदर बनविली.
‘चारकोल’मध्ये काम करणे अत्यंत अवघड आहे. त्यातही ‘चारकोल’चे प्रात्यक्षिक देणे अत्यंत जिकिरीचे काम आहे. कारण या माध्यमात काम करताना एकाग्रता आवश्यक असते. माझ्या आग्रहामुळे करणने पहिल्यांदाच प्रात्यक्षिक दिले. करणने त्याच्या कौशल्याने हे अवघड काम सर्वांसमोर सोपे करून दाखविले व सर्व उपस्थितांची वाहवा मिळविली.
श्री. प्रफुल्ल भिष्णूरकर, उपाध्यक्ष, संस्कार भारती पिंपरी-चिंचवड समिती.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील