ईएसआयसीच्या ‘स्प्री २०२५’ योजनेचा धमाका! ३ महिन्यांत ३.२० लाख कामगारांची विक्रमी नोंदणी!

पिंपरी-चिंचवडसह पुणे विभागातील औद्योगिक क्षेत्रासाठी एक अत्यंत दिलासादायक आणि ऐतिहासिक घटना समोर आली आहे! कर्मचारी राज्य विमा महामंडळाने (ईएसआयसी) सुरू केलेल्या ‘स्प्री २०२५‘ (कंपनी व कामगार नोंदणी प्रोत्साहन योजना) या विशेष योजनेला कंपन्या आणि कामगारांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे.

या योजनेच्या अंमलबजावणीच्या केवळ तीन महिन्यांच्या कालावधीत, म्हणजेच १ जुलै ते ३० सप्टेंबर २०२५ या वेळेत, पुणे विभागात तब्बल ३ लाख २० हजार कामगारांची विक्रमी नोंदणी झाल्याची माहिती ईएसआयसी कार्यालयाने दिली आहे.

हा उत्स्फूर्त प्रतिसाद औद्योगिक क्षेत्राच्या सकारात्मक दृष्टिकोनाचे स्पष्ट संकेत देतो. ‘स्प्री २०२५‘ ही योजना ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत लागू राहणार असून, याचा मुख्य उद्देश कंत्राटी, तात्पुरते तसेच असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा कवचाखाली आणणे आहे. या योजनेमुळे नोंदणी नसलेल्या कंपन्यांना आणि कर्मचाऱ्यांना कोणतीही पूर्वतपासणी किंवा थकबाकीची मागणी न करता ईएसआयसी योजनेत सामील होण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. पूर्वी नोंदणी न केल्यास कंपन्यांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागत होते,

मात्र आता कोणताही दंड आकारला जात नाही!
या नोंदणीमुळे कामगारांना मोफत वैद्यकीय सेवा, आजारपण, अपघात, मातृत्व लाभ, तसेच बेरोजगारी व अपंगत्वासाठी रोख मदत मिळणार आहे.

कामगाराच्या मृत्यूनंतर कुटुंबाला आर्थिक साहाय्य मिळण्याचा मार्गही यामुळे मोकळा झाला आहे. ईएसआयसी, पिंपरीचे शाखा व्यवस्थापक अमित साळगावकर यांनी नोंदणी केलेल्या सर्व कंपन्यांना वैद्यकीय योजनांचे फायदे देण्यासाठी ईएसआयसी सज्ज असल्याची ग्वाही दिली आहे. या योजनेमुळे लाखो असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षिततेची मोठी ढाल मिळाली आहे!

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे