कोलंबो, १५ सप्टेंबर २०२३ : कुसल मेंडिसचे अर्धशतक आणि चरिथ असलंकाच्या संयमी खेळीमुळे, श्रीलंकेने आशिया चषक स्पर्धेच्या पावसाने प्रभावित झालेल्या सुपर फोर टप्प्यातील अत्यंत रोमहर्षक सामन्यात, डकवर्थ लुईस पद्धतीने पाकिस्तानचा दोन गडी राखून पराभव करून अंतिम फेरी गाठली. रविवारी त्याचा सामना भारताशी होणार आहे. पाकिस्तानच्या २५२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेने शेवटच्या चेंडूवर आठ बाद २५२ अशी मजल मारत विजय मिळवला. मेंडिसने ८७ चेंडूंत आठ चौकार आणि एका षटकारासह ९१ धावा केल्या आणि समरविक्रम (४८) सोबत तिसऱ्या विकेटसाठी केलेल्या १०० धावांच्या भागीदारीमुळे श्रीलंकेने विजय मिळवला.
असलंकाने ४७ चेंडूत तीन चौकार आणि एक षटकारासह नाबाद ४९ धावा करत संघाला लक्ष्यापर्यंत नेले. तत्पूर्वी, यष्टिरक्षक मोहम्मद रिझवानने ७३ चेंडूंत सहा चौकार आणि दोन षटकारांसह ८६ धावांची नाबाद खेळी केली. इफ्तिखार अहमद (४७ धावा, ४० चेंडू, चार चौकार, दोन षटकार) याने सहाव्या विकेटसाठी १०८ धावांची भागीदारी केली. पाकिस्तानची धावसंख्या सात विकेटवर २५२ धावांपर्यंत पोहोचली. या दोघांच्या भागीदारीमुळे पाकिस्तानला शेवटच्या १० षटकांत १०२ धावा जोडण्यात यश आले. सलामीवीर अब्दुल्ला शफीकनेही ६९ चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांसह ५२ धावा केल्या.
पावसामुळे सामना सुरू होण्यास उशीर झाल्याने तो ४५ षटकांचा करण्यात आला. सामन्याच्या मध्यभागी पुन्हा पाऊस पडला त्यामुळे सामन्यातील षटकांची संख्या पुन्हा ४२ करण्यात आली. डकवर्थ लुईस पद्धतीने श्रीलंकेला २५२ धावांचे लक्ष्य मिळाले. श्रीलंकेसाठी मथिसा पाथिराना सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने ६५ धावांत तीन विकेट्स घेतले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड