श्रीलंका फायनलच्या दिशेने… अफगाणिस्तानचा बदला घेत दमदार विजय

पुणे, ४ सप्टेंबर, २०२२ : यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेतील अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील लढत चांगलीच अटीतटीची झाली. या सामन्यात दोन्ही संघ तुल्यबळ असल्यामुळे शेवटपर्यंत संघर्ष पाहायला मिळाला. श्रीलंकेने अफगाणिस्तानवर दमदार विजय मिळवला आहे.

श्रीलंकेने टॉस जिंकल्यावर अफगाणिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. पण यावेळी अफगाणिस्तानच्या रहमानुल्लाह गुरबाझने श्रीलंकेच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. त्याने सुरुवातीपासून श्रीलंकेच्या गोलंदाजीवर हल्ला चढवायला सुरुवात केली. त्यामुळे अफगाणिस्तानला यावेळी चांगली सुरुवात करता आली. गुरबाझने ४५ चेंडूंत ४ चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर ८४ धावांची तुफानी खेळी साकारली. गुरबाझला यावेळी इब्राहिम झारदानने ४० धावांची खेळी साकारत चांगली साथ दिली. गुरबाझच्या वादळी खेळीच्या जोरावर अफगाणिस्तानला प्रथम फलंदाजी करताना १७५ धावा करता आल्या.

अफगाणिस्तानच्या १७६ धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेला कुसल मेंडीस (३६) आणि पथुम निसंका (३५) यांनी दमदार सुरूवात केली. लंकेची अवस्था ४ बाद ११९ धावा अशी झाली असताना दनुष्का गुणतिलका ( २० चेंडूत ३३ धावा ), भानुका राजपक्षे (१४ चेंडूत नाबाद ३१ धावा) यांनी आक्रमक फलंदाजी करण्यास सुरूवात केली. त्यांनी सामना बॉल टू रन आणला. पण मोक्याच्या क्षणी तो बाद झाला. त्यामुळे पुन्हा एकदा हा सामना कोण जिंकणार, याची उत्सुकता वाढली होती. पण त्यांतर श्रीलंकेच्या वानिंडू हसरंगाने मोक्याच्या क्षणी ९ चेंडूंत तीन चौकारांच्या जोरावर नाबाद १६ धावांची खेळी साकारली आणि संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

श्रीलंकेने शारजाह मैदानावरील आतापर्यंतच्या सर्वाधिक धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला. याआधी विजयासाठी कोणत्याही संघाने १७६ धावांपर्यंतचे लक्ष्य यशस्वीपणे गाठले नव्हते.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा