कोलंबो,६ जुलै २०२० : श्रीलंकेचा क्रिकेटपटू कुसल मेंडिस याला ५ जुलै रोजी सकाळी अटक करण्यात आली. २५ वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज मेंडिस हा एका रोड अपघातातील आरोपी आहे. कोलंबोच्या पानादुरा येथे त्याने आपल्या कारने चिरडल्यामुळे एका ६४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. मेंडिस याला सोमवारी ६ जुलै रोजी दंडाधिका-यांसमोर हजर केले जाईल. त्यानंतरच त्याला जामीन मिळतो की नाही याचा निर्णय घेतला जाईल.
कोलंबो पोलिस प्रवक्त्या एसएसपी जालिया सेनारत्ने यांनी मेंडिसच्या अटकेच्या वृत्तास दुजोरा दिला.अपघातादरम्यान मेंडिस बरोबर त्याचा एक मित्रही होता. दोघांने ही कोणता नशा केला नव्हता ना याची तपासणीही पोलिस करत आहेत.
मेंडिस हा श्रीलंकेचा महत्त्वाचा खेळाडू आहे. लॉकडाऊननंतर सराव सुरू केलेल्या श्रीलंकेच्या खेळाडूंच्या संघामध्येही त्याचा समावेश होता. मेंडिसने आतापर्यंत ४४ कसोटी सामन्यांमध्ये २९९५ धावा, ७६ एकदिवसीय सामन्यात २१६७ धावा आणि २६ टी -२० मध्ये ४८४ धावा केल्या आहेत. २०१९ च्या वर्ल्ड कप संघातही त्याचा समावेश होता.
श्रीलंकेच्या क्रिकेट संघासाठी मेंडिसची अटक हा दुसरा मोठा धक्का आहे. तत्पूर्वी, जेव्हा श्रीलंकेच्या माजी क्रीडामंत्र्यांनी भारत आणि श्रीलंका यांच्यातील २०११ च्या विश्वचषक स्पर्धेची अंतिम सामना निश्चित झाल्याचा आरोप केला तेव्हा हा वाद निर्माण झाला होता. यासंदर्भात काही खेळाडूंची चौकशीही करण्यात आली. नंतर श्रीलंकेच्या क्रीडा मंत्रालयाने पुरावा नसल्यामुळे तपास थांबविला होता.
न्यूज अनकट प्रतिनिधी