पुणे, 2 जून 2022: गडचिरोली मधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. SRPF म्हणजेच राज्य राखीव दलातील अंतर्गत वादातून एका जवानाने आपल्या सहकाऱ्यावर गोळी झाडून हत्या केली. हत्या केल्यानंतर या जवानाने स्वतःला गोळी मारून आत्महत्या केली. गडचिरोली हा भाग माओवादी मुळं प्रभावित आहे. या माओवादी विरोधी कारवाई साठी या जवानांची तैनात करण्यात आली होती. दरम्यान घडलेल्या या घटनेमुळे राज्य राखीव दलामध्ये खळबळ उडालीय.
श्रीकांत बेरड आणि बंडु नवतरला अशी या दोन्ही जवानांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातून हे जवान गडचिरोली येथे तैनात करण्यात आले होते. गडचिरोली मधील अतिदुर्गम अतिसंवेदनशील मरपल्ली पोलीस ठाण्याच्या बॅरकमध्ये ही घटना घडली आहे.
श्रीकांत बेरड याने बंडु नवतरला याच्यावर रायफलने गोळी झाडली. दोघांमध्ये वाद असल्याचं सांगितलं जात आहे. आपापसातील वैमनस्यातून रागाच्याभरात हा प्रकार घडला. घटनेवेळी बंडु नवतरला चा जागेवरच मृत्यू झाला, यानंतर श्रीकांत याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. दोघेही दौंड पुणे येथील SRP कॅम्पचे जवान होते. घटनेची माहिती मिळताच वरीष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे