पुणे, १९ ऑगस्ट २०२३ : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा प्रवास करण्याकडे अनेक सामान्य नागरिककांचा कल असतो. परंतु खासगी ट्रॅव्हल्सकडून मिळणाऱ्या सुविधा एसटी प्रवासात नसल्यामुळे काही जण खासगी ट्रॅव्हल्सचा वापर करत होते. खासकरून लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी खासगी ट्रॅव्हल्सच्या प्रवासाकडे लोकांचा ओढा होता. परंतु आता एसटीनेही यामध्ये बदल केले आहे. प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी गाड्या सुरु केल्या आहेत. त्यासाठी पुण्यातील दापोडी डेपोत नवीन रचनेच्या बस तयार होत आहेत. या बस आता लवकरच रस्त्यावर धावणार आहेत.
राज्यात प्रवाशांकडून लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी सर्वाधिक पसंती स्लीपरकोच बस गाड्यांना दिली जाते. परंतु एसटीच्या ताफ्यात स्लीपर बसेस नव्हत्या. यामुळे प्रवासी खासगी ट्रॅव्हल्सने प्रवास करत होते. आता राज्य मार्ग परिवहन महामंडळाने स्लिपरकोच गाड्या तयार केल्या आहेत. पुण्यातील दापोडी येथील कार्यशाळेत या गाड्यांची बांधणी जवळपास पूर्ण होत आली आहे. लवकरच या बसेस रस्त्यांवर धावताना दिसणार आहे. एसटी महामंडळाकडून एकूण दहा बसची बांधणी केली जात आहे. बांधणीनंतर त्या विविध विभागात वितरीत केल्या जातील.
स्लीपरकोच बस गाड्या प्रवाशांना आरामदायी सुविधा देण्यात येणार आहेत. बाहेरील प्रकाशाचा त्रास टाळण्यासाठी खिडक्यांना आकर्षक रंगाचे पडदे, प्रवाशांना झोपण्यासाठी गादी आणि उशी एकत्र, प्रत्येक बर्थमध्ये मोबाईल चार्जिंगसाठी सुविधा, पाण्याची बॉटल ठेवण्यासाठी सुविधा, पर्स अडकवण्यासाठी हूक, प्रत्येक बर्थमध्ये वाचनासाठी रिडिंग लॅम्प, चालकाच्या केबिनमध्ये उद्घोषणा करण्यासाठी प्रणाली असणार आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी एक आरक्षित बर्थ असणार आहे. त्यामध्ये दिव्यांग प्रवाशाच्या सुविधेसाठी बेल,सामान ठेवण्यासाठी डाव्या बाजूला सामानकक्ष त्याचबरोबर सुरक्षेची तयारी करण्यात आली आहे.
एसटीच्या स्लीपर कोचमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी यंत्रणा कार्यन्वीत केली आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी बल्कहेड पार्टीशनवर इंटरकॉम बसवला आहे. त्याचे नियंत्रण बसच्या चालकाकडे ठेवण्यात आले आहे. चालकाच्या डोळ्यावर सरळ ऊन येऊ नये,यासाठी पडदा बसवला आहे. गाडीत शेवटी आपत्कालीन दरवाजा दिला आहे. आपत्कालीन परिस्थितीत गाडीच्या एसटीची काच फोडण्यासाठी अनेक ठिकाणी हातोडे दिले आहेत. आग विझविण्यासाठी दोन अग्निशामक उपकरणे देण्यात आली आहेत. तसेच इंजिनसाठी एफडीएसएस अग्निशामक यंत्रणा बसवली गेली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर