रत्नागिरी १६ डिसेंबर २०२३ : शासनाने मुद्रांक शुल्क आणि दंड सवलत अभय योजना २०२३ ही योजना दोन टप्यात लागू केली आहे. या योजनेमध्ये १ जानेवारी १९८० ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत नोंदणीकृत किंवा अनोंदणीकृत दस्तऐवजांकरिता, शासनास देय होणाऱ्या तथा वसुली पात्र मुद्रांक शुल्क आणि त्यावर लागू होणाऱ्या दंडामध्ये सुट तथा सवलत लागू करण्यात आली आहे. अभय योजना २०२३ चा लाभ घेण्याकरिता, दस्तऐवज व पुरक कागदपत्रांसह अर्ज हा सह-जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, रत्नागिरी कार्यालय एस.टी.स्टँड समोर, अरिहंत मॉल, दुसरा मजला अथवा तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयाकडे सादर करावा. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी सूर्यकांत घार्गे यांनी केले आहे.
१ जानेवारी १९८० ते ३१ डिसेंबर २००० या दरम्यान निष्पादीत केलेले संलेख असल्यास, योजनेच्या पहिल्या टप्यात १ डिसेंबर २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ पर्यंत देय होणारी मुद्रांक शुल्क रक्कम १ लाखापर्यंत असल्यास, मुद्रांक शुल्क व दंडाची रक्कमेस माफी देण्यात आलेली आहे. मुद्रांक शुल्क १ लाख रूपयांपेक्षा अधिक असल्यास मुद्रांक शुल्कात ५० टक्के व दंडाच्या रक्कमेस संपुर्ण सुट देण्यात आली आहे. तसेच या कालावधीतील निष्पादीत दस्तऐवजांना योजनेच्या दुसऱ्या टप्यात १ फेब्रुवारी २०२४ ते ३१ मार्च २०२४ पर्यंत देय होणारी मुद्रांक शुल्काची रक्कम १ लाखापर्यंत असल्यास मुद्रांक शुल्कात व दंडामध्ये ८० टक्के सुट तसेच देय होणारी मुद्रांक शुल्काची रक्कम १ लाखाच्या वर असल्यास मुद्रांक शुल्कात ४० टक्के व दंडामध्ये ७० टक्के माफी देण्यात आलेली आहे.
दिनांक १ जानेवारी २००१ ते ३१ डिसेंबर २०२० या दरम्यान निष्पादीत केलेले संलेख असल्यास योजनेच्या पहिल्या टप्यात १ डिसेंबर २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ पर्यंत देय होणारी मुद्रांक शुल्क रक्कम २५ कोटीपर्यंत असल्यास मुद्रांक शुल्कात २५ टक्के माफी व दंडाची रक्कम २५ लाखापेक्षा कमी असेल तर दंडामध्ये ९० टक्के सुट, तसेच दंडाची रक्कम २५ लाखापेक्षा जास्त असल्यास केवळ २५ लाख एवढीच शास्तीची रक्कम देय असेल आणि उर्वरीत शास्ती माफ करण्यात येईल. मुद्रांक शुल्काची रक्कम २५ कोटीपेक्षा जास्त असल्यास मुद्रांक शुल्कात २० टक्के माफी तसेच दंडाची रक्कम १ कोटी एवढीच रक्कम देय असेल आणि उर्वरीत शास्ती माफ करण्यात येईल. तसेच या कालावधीतील निष्पादीत दस्तऐवजांना योजनेच्या दुसऱ्या टप्यात १ फेब्रुवारी २०२४, ३१ मार्च २०२४ पर्यंत देय होणारी मुद्रांक शुल्काची रक्कम २५ कोटीपर्यंत असल्यास मुद्रांक शुल्कात २० टक्के माफी व दंडाची रक्कम ५० लाखापेक्षा कमी असेल तर दंडामध्ये ८० टक्के सुट, तसेच दंडाची रक्कम ५० लाखापेक्षा जास्त असल्यास केवळ ५० लाख एवढीच शास्तीची रक्कम देय असेल आणि उर्वरीत शास्ती माफ करण्यात येईल. मुद्रांक शुल्काची रक्कम २५ कोटीपेक्षा जास्त असल्यास मुद्रांक शुल्कात १० टक्के माफी तसेच दंडाची रक्कम २ कोटी एवढीच रक्कम देय असेल आणि उर्वरीत शास्ती माफ करण्यात येईल. या बाबतची सविस्तर माहिती मुद्रांक जिल्हाधिकारी सूर्यकांत घार्गे यांनी दिली आहे.
न्युज अनकट प्रतिनीधी : केतन पिलणकर