भारतासह जगात चेंगराचेंगरीच्या अनेक घटना घडतात. त्यात निरपराधांचे बळी जातात. घटना घडली की तेवढ्यापुरती चर्चा होते. काही लाख रुपये मृतांच्या वारसांच्या तोंडावर फेकले की सरकार आणि आयोजकांची जबाबदारी संपते, असे मानले जाते; परंतु अशा घटना पुढे होणार नाहीत, यासाठी काहीच उपाययोजना केल्या जात नाहीत. चौकशांचे अहवाल सरकारदरबारी धूळ खात पडतात आणि पुढच्या दुर्घटनांची वाट पाहतात.
दक्षिण भारतात चेंगराचेंगरीच्या घटना कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. गेल्या आठ महिन्यांत तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडू या दक्षिणेकडील राज्यांमध्ये चेंगराचेंगरीच्या तीन घटना झाल्या आहेत. त्यात पन्नास जणांचा मृत्यू झाला. चेंगराचेंगरीच्या घटनांत प्रामुख्याने दुर्बल घटकांचे, म्हणजेच महिला आणि मुलांचे प्रमाण जास्त असते.
कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथे जूनमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या पहिल्या ‘इंडियन प्रीमियर लीग’ विजेतेपदाच्या उत्सवादरम्यान चेंगराचेंगरी घडली. एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत अकरा जणांचा मृत्यू झाला आणि ५६ जण जखमी झाले. त्यानंतर तमिळनाडूतील ‘वेट्टी कागम’चे नेते आणि अभिनेता विजय यांच्या करूर येथे झालेल्या रॅलीदरम्यान चेंगराचेंगरी होऊन त्यात ३९ जणांचा बळी गेला. या घटनांमुळे भारतातील मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांदरम्यान सुरक्षेतील अपयश अधोरेखित होते.
जिथे जास्त गर्दी होते, तिथेच नियोजनाचा बोजवारा उडतो आणि त्यातून अपघात होतात. त्यात ज्यांची चूक नाही, त्यांचाच बळी जातो. हैदराबादमध्ये ‘पुष्पा २’ च्या प्रीमियरदरम्यान अल्लू अर्जुन संध्या थिएटरमध्ये आला, तेव्हा चेंगराचेंगरी झाली. त्यामुळे गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. त्यानंतर झालेल्या गोंधळात एका महिलेचा मृत्यू झाला. पोलिसांना गर्दी नियंत्रणातील अपयश आणि गैरव्यवस्थापन हे प्राथमिक कारण असल्याचे सांगितले गेले. या घटनेची जबाबदारी पोलिसांनी अर्जुनवर टाकली. त्याला अटक करण्यात आली. तेलंगणा न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली; परंतु नंतर उच्च न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. सध्या हा खटला न्यायालयात प्रलंबित आहे.
४ जून २०२५ रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) च्या पहिल्या ‘इंडियन प्रीमियर लीग’ विजेतेपदाच्या उत्सवादरम्यान बेंगळुरूमध्ये चेंगराचेंगरी झाली. एम. चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत अकरा जणांचा मृत्यू झाला आणि ५६ जण जखमी झाले. तिथे संघाच्या सत्कार समारंभासाठी अपेक्षेपेक्षा मोठ्या संख्येने गर्दी जमली होती. भारतीय संघाने विश्वचषक जिंकल्यानंतर मुंबईतही अशीच तुफान गर्दी झाली होती; परंतु तिथे किरकोळ चेंगराचेंगरी वगळता मोठी दुर्घटना घडली नाही.
धार्मिक तसेच अन्य कार्यक्रमाचे नियोजन करताना किती गर्दी होणार आहे, याचा अंदाज घेऊन तसे नियोजन करायला हवे. अपेक्षेपेक्षा जास्त लोक येणार असतील, तर त्यांना वेळीच रोखले पाहिजे; परंतु गर्दीची झिंग चढलेल्यांना जास्तीत जास्त गर्दी जमवून शक्तीप्रदर्शन करायचे असते. त्याला लोक बळी पडतात.
आवडत्या व्यक्तींना आता घरात बसून पाहण्याची सोय असताना गर्दीच्या ठिकाणी जाण्याचा अट्टहास का होतो, याचे उत्तर मिळत नाही. एवढ्या गर्दीत जाऊन आपल्या कथित दैवतांना ना भेटता येते, ना जवळून पाहता येते; तरीही गर्दीत जाऊन मरणाला जवळ करण्याचे काहीच कारण नाही.
तामिळनाडूतील करूरमध्ये विजय निवडणुकीचा प्रचार करत होता. या मोहिमेसाठी हजारो लोक जमले होते. सकाळपासून ते वाट पाहत होते. उष्णतेमुळे अनेक लोक बेशुद्ध पडले आणि त्यात चेंगराचेंगरी झाली. निवडणुकीच्या सभेसाठी एवढे उपाशी, तापाशी जाऊन लोक काय साध्य करणार होते, हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. त्यातच निवडणुकीच्या प्रचारसभेला मुलांना न्यायचे कशाला, हे समूहमनाला कळले नाही.
देशात २५ वर्षांच्या काळात घडलेल्या घटनांचा मागोवा घेतला, तर त्याची भयावहता लक्षात येते. राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो (एनसीआरबी)च्या आकडेवारीनुसार १९९६ ते २०२२ दरम्यान भारतात ३,९३५ चेंगराचेंगरीच्या घटना नोंदल्या गेल्या. त्यात तीन हजारांहून अधिक मृत्यू झाले. धार्मिक उत्सव, राजकीय रॅली आणि सेलिब्रिटी कार्यक्रमांदरम्यान सार्वजनिक सुरक्षा सुनिश्चित करण्यात सतत अपयश आल्याचे हे आकडे दर्शवतात.
या दुर्घटनांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचा मोठा वाटा आहे. उत्तर प्रदेशात एका धार्मिक कार्यक्रमात चेंगराचेंगरीत सव्वाशेहून अधिक मृत्यू होऊनही धार्मिक कार्यक्रम ज्यांच्यासाठी घेतला, त्यांना चेंगराचेंगरीतून ‘क्लीन चिट’ देण्यात आली. हे व्यंग्य नाही; हे आपल्या देशातील चेंगराचेंगरीचे कठोर वास्तव आहे.
कोणालाही शिक्षा का होत नाही? आपण आणि सरकारी यंत्रणादेखील विविध तपासांच्या जाळ्यात कसे अडकतो? भूतकाळातील घटना विसरून नवीन घटनांची वाट का पाहतो? दोष कुठे आहे, या प्रश्नांची उत्तरे शोधली पाहिजेत.
२०११ मध्ये सबरीमाला येथील अरुंद मार्गावर १०६ लोकांचा मृत्यू झाला. २०१३ मध्ये अलाहाबादमधील कुंभमेळ्यादरम्यान रेल्वे स्थानकावर गर्दीमुळे ३६ जणांचा मृत्यू झाला. २०१४ मध्ये पाटण्यातील गांधी मैदानात झालेल्या चेंगराचेंगरीत ३० हून अधिक जणांचा मृत्यू झाला. या घटनांची यादी संपणार नाही.
तामिळनाडूतील करूर येथे अभिनेता आणि राजकारणी विजयच्या रॅलीमध्ये चेंगराचेंगरीत तीन डझनहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. शेकडो जखमी रुग्णालयात आहेत. मृतांचा आकडा अजूनही वाढू शकतो. आणि नेहमीप्रमाणे, पोलिस अधिकाऱ्यांचा एकमेव युक्तिवाद असा आहे की ते चौकशी करत आहेत. जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत काहीही सांगणे कठीण आहे.
भारतात वारंवार होणाऱ्या चेंगराचेंगरीमुळे आपल्या प्रशासन, व्यवस्था आणि राजकीय व्यवस्थेतील गंभीर त्रुटी उघडकीस येतात. धार्मिक स्थळे असोत, राजकीय रॅली असोत किंवा इतर कोणताही प्रसिद्ध कार्यक्रम — दरवर्षी लाखो लोकांची गर्दी जमते आणि सुरक्षा व्यवस्थेतील अभाव किंवा निष्काळजीपणामुळे जीव जाऊ शकतो.
वारंवार अशाच प्रकारच्या घटना घडूनही धडे का घेतले जात नाहीत? गर्दी व्यवस्थापनात सुधारणा का होत नाहीत? उच्च पदांवर असलेले लोक चौकशीतून का सुटतात? फक्त खालच्या स्तरावरील कर्मचाऱ्यांवर किंवा अज्ञात कारणांमुळे दोष देऊन केस रद्द केली जाते. त्यामुळे लोकांची मानसिकता अशी होते की गुन्हा केला तरी काही होत नाही.
कार्यक्रम किंवा रॅलींसाठी अपेक्षित गर्दीचा अचूक अंदाज लावला जात नाही. गर्दी अनेकदा अपेक्षेपेक्षा जास्त असते. त्यामुळे स्थानिक प्रशासन असहाय्य ठरते. गुप्तचर संस्था, पोलिस आणि प्रशासन अनेकदा या समस्येचे निराकरण करण्यात अपयशी ठरतात.
आत प्रवेश करण्याचे आणि बाहेर पडण्याचे दरवाजे अपुरे असतात. आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग अस्तित्वात नसतात किंवा अवरोधित असतात. गर्दी नियंत्रण बॅरिकेड्स आणि सूचना फलक कमकुवत असतात किंवा अस्तित्वातच नसतात. यामुळे अशा दुर्घटना होतात.
जेव्हा कार्यक्रमात प्रमुख राजकारणी, धार्मिक नेते किंवा अति महत्त्वाच्या व्यक्ती असतात, तेव्हा प्रशासन आयोजक आणि नेत्यांना राग येऊ नये म्हणून अनेकदा कारवाई करण्यापासून परावृत्त होते.
प्रत्येक मोठ्या चेंगराचेंगरीनंतर स्वतंत्र तपासाचे आदेश दिले जातात; परंतु निकाल अनेकदा दुर्लक्षित होतात आणि प्रकरण बंद मानले जाते. जास्त गर्दी आणि अफवांमुळे होणारी चेंगराचेंगरी ही विजयच्या रॅलीतील प्राथमिक कथा बनली आहे. मानवी चूक कनिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याकडून किंवा पोलिस अधिकाऱ्याकडून होते. उच्चपदस्थ अधिकारी आणि आयोजक अनेकदा सुरक्षितपणे सुटतात.
गर्दी व्यवस्थापन योजना आवश्यक आहे. प्रत्येक मोठ्या कार्यक्रमासाठी किमान मानके स्थापित केली पाहिजेत. रॅली, धार्मिक कार्यक्रम आणि मेळ्यांसाठी गर्दी क्षमता मर्यादा पूर्वनिर्धारित केल्या पाहिजेत. सीसीटीव्ही पाळत ठेवणे, ड्रोन आणि गर्दी-जागरूकता सेन्सर बसवले पाहिजेत. गर्दीची घनता मोजणे आणि वळवणे यासारख्या उपाययोजना अंमलात आणल्या पाहिजेत.
जर अपघात झाला तर केवळ किरकोळ कर्मचारीच नव्हे, तर मुख्य आयोजक, स्थानिक प्रशासकीय प्रमुख आणि पोलिस प्रमुख यांनाही कायदेशीररित्या जबाबदार धरले पाहिजे. या घटनेची चौकशी केवळ कर्तव्यदक्ष दंडाधिकाऱ्यांपुरती मर्यादित राहू नये. जबाबदार व्यक्तींची नावे जाहीर करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर एक स्वतंत्र आयोग स्थापन करावा.
विजयच्या रॅलीतील डझनभर मृत्यू हा दुर्दैवी योगायोग नाही; तर दरवर्षी शेकडो जीव घेणाऱ्या त्याच अपयशी व्यवस्थेचा भाग आहे. प्रश्न अशा अपघातांचा नाही, तर आपल्या व्यवस्थेतून गहाळ झालेल्या जबाबदारीचा आहे.
जोपर्यंत उच्चपदस्थ राजकीय आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना कायदेशीररित्या जबाबदार धरले जात नाही, तोपर्यंत हे अपघात भरपाई आणि औपचारिक चौकशीखाली दबले जातील.
जेव्हा गर्दी नियंत्रण हा प्राथमिक सुरक्षा अजेंडा बनवला जाईल आणि गुन्हेगारांना त्यांच्या पदानुसार शिक्षा दिली जाईल, तेव्हाच हजारो जीव गमावलेल्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
अशा घटनांनंतर सातत्याने एकच गोष्ट सांगितली जाते — गर्दी अचानक वाढली, अफवा पसरल्या आणि लोक घाबरले. पण ही मानवी चूक नाही, तर प्रशासकीय अपयश आहे. जबाबदारी निश्चित करण्याऐवजी सरकारी यंत्रणा नुकसानभरपाई देऊन प्रकरण संपवण्याचा विचार करते. त्यामुळेच पीडितांच्या कुटुंबांना न्याय मिळण्यापासून वंचित ठेवले जाते.
भागा वरखडे